Manohar Joshi : मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत | पुढारी

Manohar Joshi : मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी “अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेलेमनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! ” असं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. (Manohar Joshi)

Manohar Joshi : शून्यातून विश्व निर्माण करणारे..

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे गटाचे, खासदार संजय राऊत यांनी ‘X’ खात्यावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “शून्यातून विश्व निर्माण करणारे. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणुन जगलेलेमनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! “

मुंबईचा महापौर ते मुख्यमंत्री 

मनोहर जोशी बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. राजकीय वर्तुळात त्यांना ‘जोशी सर’ म्हटले जायचे. १९९५ ते १९९९ पर्यंत महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वोच्च पद भूषवणारे अविभाजित शिवसेनेचे ते पहिले नेते होते. मुंबईचा महापौर ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी ६ वर्ष काम केले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर २००२ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ते लोकसभेचे अध्यक्ष होते. (Manohar Joshi)

मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे पार्थिव सकाळी ११ ते २ या वेळेत माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेज येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button