23 जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होणार | पुढारी

23 जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होणार

पुढारी ऑनलाईन: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होत असून 23 ते 25 जून या कालावधीत तो कोकण, विदर्भ, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात बरसण्यास सुरुवात करणार आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत आहे.

पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती ट्विटरवर द्वारे दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात 23 पासून मान्सून जोर धरणाच्या तयारीत आहे. 23 रोजी कोकण व विदर्भातून बरसण्यास सुरवात करेल. त्यानंतर 24 व 25 रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तो बरसण्यास सुरुवात करेल. विजाच्या कडकडाटासह राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात होत आहे.

मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय..

मान्सूनची दुसरी शाखा पश्चिम बंगाल व बिहारमधून उत्तर भारतात सक्रिय झाली आहे. तेथून तो हिमालयाच्या दिशेने निघाला आहे. एकदा त्याने हिमालय पार केला की, मान्सून स्थिर होऊन चांगला बरसण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर, दक्षिणेतून येणार पाऊस…

महाराष्ट्रात मान्सून सध्या क्षीण झालेला असला तरी बुधवारी त्याने दक्षिण भारतात प्रगती केली. बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश भागात पाऊस सुरू झाला असून वाऱ्याचा वेग 55 ते 60 किमी इतका वाढला आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात मान्सून जोर धरत आहे. या दोन्ही वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.

हेही वाचा:

Ashadhi Wari 2023 : लाखो वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शासनातर्फे विमा संरक्षण लागू

पुणे : बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब ; किलोमागे 20 ते 40 रुपये वाढ

पुणे : कुरुलकरच्या गुन्ह्यात कलम वाढ ; पाकिस्तानी ललनेलाही बनविले सहआरोपी

 

Back to top button