

पुढारी ऑनलाईन: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत आलेली जाहिरात हा गेल्या आठवड्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याचे म्हटले होते. या जाहिरातीनंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले होते. हे सुरु असतानाच आणखी एक सर्व्हे पुढे आला आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे.
या नवीन सर्व्हेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, तुम्ही काय बोलताय? तुम्ही परवाची जाहिरात बघितली नाही. आम्हाला मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता तब्बल २६ टक्के मते मिळाली आहेत. आणि आता तुम्ही काही तरीच सांगत आहात. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रहायचे आहे की नाही" असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे १९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा: