पुणे : पाऊस नसल्याने बटाटालागवड खोळंबली | पुढारी

पुणे : पाऊस नसल्याने बटाटालागवड खोळंबली

पेठ : पुढारी वृत्तसेवा :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात पाऊस लांबल्याने पावसाळी बटाटालागवड खोळंबली आहे. सातगाव पठार हे खरीप हंगामातील बटाट्याचे आगार समजले जाते. येथील शेतकर्‍यांनी पंजाब, हरियाणामधून बटाटा बियाणे खरेदी करून 15 दिवस लोटले. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

दरवर्षी जून महिन्यात सातगाव पठारावरील साडेपाच ते सहा हजार एकर शेती क्षेत्रात येथील शेतकरी बटाटालागवड करत असतात. मात्र जून महिन्याचे अखेरचे 10 ते 11 दिवस बाकी असताना अद्यापि पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस पुरेसा झाल्याबरोबर पंजाब, हरियाणा येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेले बटाटा बियाणे सातगाव पठारावरील बहुतांश शेतकरी बुकिंग करतात. त्यानंतर बियाणांचे शेकडो ट्रक सातगाव पठार भागात येतात.

सध्या सातगाव पठारावर कडक ऊन व वारे वाहत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत कामे खत पेरणी सोडून इतर कामे प्रलंबित आहेत. सध्या लग्नसराई संपली आहे. शेतात काहीच काम नाही. वळवाचा पाऊस झाला नाही. शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. आभाळात ढगांची गर्दी होत आहे. मात्र, पाऊस काही पडत नाही. पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
पाऊस वेळेत न पडल्याने शेतकरी, हुंडेकरी व्यावसायिक हे अडचणीत येणार असल्याचे कुरवंडी येथील शेतकरी विकास बारवे, कोल्हारवाडीचे ज्ञानेश्वर माउली एरंडे, भावडीचे अशोक बाजारे, गोरक्षनाथ नवले, कुदळेवाडीचे शेतकरी प्रकाश कुदळे, बाबाजी कुदळे, पारगाव तर्फे खेड येथील विलासराव पवार, पेठचे दिलीपराव पवळे यांनी सांगितले.

पंजाब, हरियाणा येथे शेतकर्‍यांनी खरेदी केलेले बटाट्याचे बियाणे जेवढे जास्त दिवस तेथे ठेवले जाईल, तितके भाडे वाढत जात असल्याची खंत शेतकरी शिवाजी पवळे यांनी व्यक्त केली. लवकरात लवकर पाऊस पडला तर मात्र शेतकरी आपले बटाटे बियाणे सातगाव पठार भागात आणण्यासाठीची व्यवस्था करतात. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले यांनी सांगितले.

Back to top button