“पूर्वीचे सरकार घरी, आम्ही मात्र लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला

“पूर्वीचे सरकार घरी, आम्ही मात्र लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: राज्यात पूर्वी ७० हजार कोटी रुपये खर्च केले गेले तरी सिंचन झाले नाही. मात्र, आता सिंचन योजनेला गती दिली आहे. आमचे सरकार खोटे काम करत नाही आणि खोटी आश्वासने देत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे आमचे सरकार आहे. आम्ही घरात बसून कुठलाही आदेश देत नाही. आम्ही बाहेर फिरतो, जनतेत मिसळतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. या पूर्वीचे सरकार घरी होते. आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, अशी जोरदार टीकाही शिंदे यांनी केली

पिंपरीत चिंचवडमधील लोकांना 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप, दाखले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपले सरकार येण्यापूर्वी सरकार घरात बंद होते. राज्यात लॉकडाऊन लावले जात होते. लोकांना घाबरून घरी बसविले जात होते. मात्र, आम्ही सर्व उघडले. मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे केले. लोक घराबाहेर पडल्याने कोरोना पळून गेला. तसेच प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे ऐकलेच पाहिजे. कारण लाखो लोकांतून ते निवडून आलेले असतात. कोणत्याही अधिकाऱ्याने इगो ठेवू नये. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एका रथाचे दोन चाके आहेत असं देखील शिंदे म्हणाले.

राज्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. आतापर्यंत ३५ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ वाटला आहे. गेल्या ११ महिन्यांतील निर्णय वाचायला वेळ पुरणार नाही. एवढे निर्णय आम्ही घेतले. यामधील काही निर्णय पहिल्यांदा घेतले. एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्के, तर ज्येष्ठांना मोफत बस प्रवास सुरु केला. या निर्णयाचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला. आतापर्यंत शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षाला सहा हजार देत होते. त्यानंतर राज्य शासनानेही सहा हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जात आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत पाच वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

'इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण केली जाणार'

गेल्या काही महिन्यापासून इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याचं समोर आलं आहे. नदीत केमिकलयुक्त पाणी सोडलं जात होतं. त्यामुळे आळंदीकरांच्या जीवाशी खेळ सुरु होता. आता इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की, पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंतांना दिल्या आहेत. इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीचं शुद्धीकरण केलं जाईल. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्याला फेस आला होता. वारकऱ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ माध्यमांनी समोर आणला होता. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या केमिकलयुक्त पाणी नदीत सोडत असल्यानं इंद्रायणी दूषित झाली होती. त्या अनुषंगाने नदीचं शुद्धीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news