पुणे : कुरकुंभला अपघातात सहा जण जखमी ; एसटी बस-टेम्पोत धडक | पुढारी

पुणे : कुरकुंभला अपघातात सहा जण जखमी ; एसटी बस-टेम्पोत धडक

कुरकुंभ (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ (ता. दौंड) येथील घाटात एसटी बस आणि टेम्पो यांच्यातील अपघातात एसटीतील पाच प्रवासी आणि टेम्पोचालक, असे सहाजण जखमी झाले. गुरुवारी (दि. 15) दुपारी हा अपघात झाला. रामाभाऊ फकिरा माळी (वय 60, रा. ता. देवळली भूम, जि. उस्मानाबाद), रतन शिवाजी कारंडे (वय 55, रा. गोंदी, ता. इंदापूर), शंकर हरिश्वर नवले (वय 70, रा. कंदर, ता. करमाळा), सुलताना ख्वाजा मोमीन (वय 55), आशा चंद्रभान सोनवणे (वय 50, दोघी रा. निगडी, पिंपरी-चिंचवड), टेम्पोचालक सुरज मुरलीधर जाधव (वय 26, रा. जाधववस्ती, जिरेगाव, ता. दौंड) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो (एमएच 05 एएम 1592) हा दौंड बाजूने जात होता, तर परळ आगाराची मुंबई-अहमदपूर बस (एमएच 13 सीयू 7950) कुरकुंभकडे निघाली होती. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ घाटाच्या चढावर एसटी बस व खडी वाहतुकीचा टेम्पो यांच्यात धडक झाली. त्यात बसमधील पाच प्रवासी व टेम्पोचालक जखमी झाले. जखमींना दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दौंड एसटी आगाराचे व्यवस्थापक शिवाजी कानडे, वाहतूक निरीक्षक प्रतीक अनाके यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. कुरकुंभचे पोलिस हवालदार एस. एम. शिंदे, संजय नगरे, सागर म्हेत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात नोंद झाली नव्हती.

 

Back to top button