Kamakhya Temple : शिंदे गट कामाख्या देवीचं नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला; जाणून घ्या या मंदिराचा इतिहास  | पुढारी

Kamakhya Temple : शिंदे गट कामाख्या देवीचं नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला; जाणून घ्या या मंदिराचा इतिहास 

पुढारी ऑनलाईन डेस्क : चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर ते आसामची राजधानी गुवाहाटीला आमदारांसह गेले. एक एक करत शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांना मिळाले. तेव्हा गुवाहाटी खूप चर्चेत आली होती. या गटाने गुवाहाटीतील तंत्र-मंत्र साधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कामाख्या (Kamakhya Temple) मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. आज (दि.२६) पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार-पाच महिन्यांनी काही मंत्री व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. तेथे ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. जाणून घेवूया कामाख्या मंदिराबद्दलच्या खास गोष्टी…

Kamakhya Temple : कुठे आहे कामाख्या मंदिर? 

पुन्हा एकदा चर्चेत आलेले कामाख्या मंदिर (Kamakhya Temple) हे आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. या मंदिरातील कामाख्या देवी जागृत देवस्‍थान म्हणून ओळखली जाते. ही देवी ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. आठव्या-नवव्या शतकात या मंदिराची रचना झाली असावी, असे मानले जाते. बिहारमधील राजा नर नारायण सिंह यांनी १७ व्या शतकात या मंदिराची पुर्नरचना केली. हे मंदिर एक महत्त्‍वाचे शक्तीपीठ मानले जाते.   
या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात मूर्तीच नाही. त्या बाबतीत बऱ्याच अख्यायिका सांगितल्या जातात. एका धार्मिक ग्रंथानुसार अशी अख्यायिका आहे की, भगवान महादेव यांचा देवी सतीप्रती असलेला मोहभंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीदेवीच्या मृत तुकड्याचे तब्बल ५१ भाग केले. अवयवाचे तुकडे ज्या ज्या भागात पडले ती ठिकाणे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस आली.

अंबुवाची पर्वाला अनन्यसाधारण मह्त्त्व

अंबुवाची पर्वाला अनन्यसाधारण मह्त्त्व आहे. तीन दिवस हा सोहळा सुरु असतो. या पर्वात वर्षातून एकदा देवी रजस्वला होते. या दिवसांत देवीची पूजा केली जाते. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांगलादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन येथे साधना करतात.
Kamakhya Temple
Kamakhya Temple

प्रसाद म्हणून लाल कापड 

या देवीचा इतिहास जसा रंजक आहे तसा या देवीचा प्रसाद ही अनोखा आहे. या प्रसादाचे पावित्र्य खूप असल्याचे भाविक सांगतात. देवीच्या दरबारात अंबुवाची पर्व दिवसात एक पांढरे कापड ठेवले जाते. तीन दिवसांनी जेव्हा देवीचा दरबार खुला केल्यानंतर ते कापड लाल झालेले असते. देवीचे हे  कापड प्रसाद म्हणून दिले जाते. या प्रसादाला भाविकांच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कापडाला अंबुवाच कापड असंही म्‍हटलं जाते. हे मंदीर तंत्र-मंत्र साधनेसाठी खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात तुम्ही व्यक्त केलेली कामना पूर्ण होते, भाविकांची अशी श्रद्धा आहे की, म्हणून या मंदिराला कामाख्या मंदिर म्हटलं जाते.

हेही वाचा

Back to top button