कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून सीमाभागाचा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र आपली बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कर्नाटकचे मुख्यमंत्री मोठे नाहीत. त्यामुळे न्यायालयात महाराष्ट्राला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, घटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारात महाराष्ट्र आपला हक्क मागत आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. आपल्या बाजूने निकाल लागेल. एकही गाव कर्नाटकला मिळणार नाही.
निपाणी, कारवार, बेळगावसह अनेक गावांवर महाराष्ट्राचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिकेत आम्ही हा दावा केला आहे. त्यामुळे मी कोणतेही चिथावणीखोर वक्तव्य केलेले नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Back to top button