महिलांनी काही घातले नाही तरी त्या सुंदर दिसतात, योगगुरू रामदेव बाबांचे आक्षेपार्ह वक्तव्य | पुढारी

महिलांनी काही घातले नाही तरी त्या सुंदर दिसतात, योगगुरू रामदेव बाबांचे आक्षेपार्ह वक्तव्य

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महिला साडी आणि सलवार सूटमध्ये सुंदर दिसतात. त्यांनी काही घातले नाही तरी त्या सुंदर दिसतात, असे वादग्रस्त विधान शुक्रवारी योगगुरू रामदेव बाबा यांनी केल्याने संतप्त पडसाद उमटू लागले आहेत.

पतंजली योगपीठाच्या वतीने ठाण्यात आयोजित योग विज्ञान शिबिरात त्यांनी हे विधान केले. महिलांसाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. पहिल्या शिबिरासाठी सुटसुटीत ड्रेसमध्ये आलेल्या बर्‍याच महिलांना विशेष कार्यशाळेसाठी योगासाठी साडी परिधान करणे वेळेअभावी जमले नाही. याची दखल घेत रामदेव बाबा यांनी व्यासपीठावरून विधान केले. ते म्हणाले की, महिलांना साडी परिधान करता आली नाही, काही हरकत नाही. घरी जाऊन त्या साडी नेसू शकतात. तसेही महिला साडी आणि ड्रेसमध्ये तर सुंदर दिसतात. त्यांनी काही घातले नाही, तरी त्या सुंदरच दिसतात.

त्यांच्या या विधानाचे संतप्त पडसाद उमटले असून, विविध राजकीय पक्ष व महिला संघटनांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील यांनी रामदेव बाबा यांना पुण्यात आल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button