Sanjay Raut : "देशात द्वेषाचे राजकारण आणि सुडाचे बुडबुडे फुटताहेत" | पुढारी

Sanjay Raut : "देशात द्वेषाचे राजकारण आणि सुडाचे बुडबुडे फुटताहेत"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही बदलला जात आहे काय? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे. हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे सध्या ७५ वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. हिंदुस्थानात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरूंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरू, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले”, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरामधून केली आहे.

“ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत म्हणतात…

स्वातंत्र्य लढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या त्या कालखंडातील त्या त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते. त्या घटनांचे, घडामोडींचे, विचारप्रवाहांचे ते एक प्रकारचे विवेचन असते. थोडक्यात, इतिहास हे मानवी समाजाचे एक अखंड, अभंग आणि अविभाज्य छायाचित्रच असते. त्या छायाचित्रांतून पंडित नेहरूंना वगळून कोणाला काय साध्य करायचे आहे?

विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार?

नेहरू केंब्रिजला शिकले, बॅरिस्टर झाले. अलाहाबाद हायकोर्टात वकिली करू लागले. १९१२ मध्ये बंकीपूर काँग्रेसमध्ये त्यांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला. १९२१ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. १९२८ साली सायमन कमिशनविरुद्ध निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करीत असताना त्यांच्यावर लाठीमार झाला. १४ एप्रिल १९३० साली मिठाच्या कायदेभंग मोहिमेत त्यांना अटक झाली व सहा महिन्यांचा कारावास घडला.

१९३२ साली त्यांना पाचव्यांदा कारावास घडला. ३१ ऑक्टोबर १९४० साली पुन्हा अटक व चार वर्षांची सजा. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात ‘भारत छोडो’ ठराव मांडला, वातावरण पेटले. नेहरूंना पुन्हा अटक झाली. अटक करून त्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवले. तो अखेरचा आणि सर्वात दीर्घ तुरुंगवास होता. ‘भारत छोडो’ आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जनसंघाचे संस्थापक कुठेच नव्हते. नेहरू, पटेल या आंदोलनात तुरुंगात गेले. या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पुस्तक ‘काँग्रेस रेडिओ’ असे प्रसिद्ध झाले. उषा ठक्कर त्याच्या लेखिका आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या  इतिहासातून नेहरूंचे चित्र वगळणाऱ्या ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे.

नेहरू हे गांधींचे मवाळ चेले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या संग्रामातील अखेरचा अग्रगण्य नेता म्हणून नेहरूंनाच मान्यता द्यावी लागेल. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी जो क्रांतिकारक भाग घेतला तो इतिहास कधीच विसरणार नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती. १५ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायरने जालियनवाला बागेत जो नरसंहार केला, त्या कत्तलीचा निषेध करणारी जळजळीत भाषणे नेहरूंनी ठिकठिकाणी केली. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी ठिणगी टाकली. तेव्हापासून नेहरू हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले. नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्याला न्यायाचे अधिष्ठान होते. नेहरू हे श्रीमंतीत जन्मास आले व श्रीमंतीत वाढले. इंग्लंडच्या ‘हॅरो’ शाळेत ते शिकले. केंब्रिजमध्ये पुढचे शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले. बॅरिस्टरीचा झगा चढवून ते खोऱ्याने पैसा मिळवू शकले असते, पण त्यांनी त्या सगळ्याचा त्याग केला व स्वातंत्र्य लढ्यात उतरले. ‘फकीर’ म्हणवून घेणारा लढ्यात उतरतो ती गोष्ट वेगळी, पण सर्वस्व झोकून नेहरू, सावरकरांसारखे बॅरिस्टर सुखाचा त्याग करतात तेव्हा त्यांचे योगदान नाकारणारेच इतिहासाचे खलनायक ठरवले जातात, अशीही टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात काही विशेष व्यक्ती जन्माला येतात आणि आपल्या विचारांनी जगाला एका नवीन विचारप्रवाहात ओढून नेतात. नेहरू हेदेखील असेच व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या विचारांतून शांततेचा संदेश देताना ‘जगा व जगू द्या’ हे तत्त्व सर्वांनी स्वीकारावे असा आग्रह धरला. श्रीमंत व माजोरड्या राष्ट्रांच्या तुलनेत गरीब, मागास व दुर्बल राष्ट्रांचा एक गट तयार केला, त्यांना एकतेच्या भावनेने बांधले (आज ही एकी तुटली आहे व जगात हिंदुस्थानला मित्र उरले नाहीत). नेहरूंचा द्वेष करावा असे त्यांच्याकडून काय घडले? उलट नेहरूंनी निर्माण केलेल्या संस्था, सार्वजनिक उपक्रम विकून देशाचा आर्थिक गाडा चालवला जात आहे.

नेहरूंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून सरकार मजा मारीत आहे. नेहरूंनी राष्ट्रीय संपत्ती निर्माण केली नसती तर देशात बेरोजगारी, उपासमारीचे अराजक माजले असते. नेहरूंच्या दूरदृष्टीपणामुळे हे संकट टळले. याबद्दल सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण याउलट देशाच्या स्वातंत्र्य समरातून नेहरूंचे नावच गायब केले गेले. देशात सूडाच्या राजकारणाचे प्रवाह उसळत आहेत व द्वेषाचे बुडबुडे फुटत आहेत, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button