धूळ खात पडलेल्या व्हिंटेज कार अखेर ‘तो’ विकणार! | पुढारी

धूळ खात पडलेल्या व्हिंटेज कार अखेर ‘तो’ विकणार!

लंडन : व्हिंटेज कार म्हणजेच जुन्या जमान्यातील मोटारींचा शौकीन असलेल्या एका बि—टिश व्यक्‍तीने आता आपल्या 174 वाहनांचा संग्रह विकण्याचे ठरवले आहे. याचे कारण म्हणजे इतक्या मोटारी ठेवण्यासाठी त्याला आता लंडनमध्ये जागा मिळत नाही. त्याच्या या संग्रहात 1940 पासूनच्या मोटारी व अन्य वाहने आहेत.

ही वाहने सध्या स्थानिक कौन्सिलच्या एका वेअरहाऊसमध्ये पार्क केलेली आहेत. मात्र, आता कौन्सिलने ही जागा परत मागितली आहे. त्यामुळे मालकाने हा संग्रह विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी अशा अनेक मोटारी अक्षरशः धूळ खात पडल्या आहेत. या संपूर्ण कलेक्शनची किंमत त्याने दहा लाख पौंड म्हणजेच दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक सांगितली आहे. या कलेक्शनमधील मोटारींची किंमत शंभर पौंड ते 25 हजार पौंडांपर्यंत आहे.

या मोटारींमध्ये मर्सिडिज, पोर्श, बीएमडब्ल्यू, टोयोटा, एमजी एमजीए आदींचा समावेश आहे. यापैकी सर्वात महागडी कार 1960 मधील लाल रंगाची एमजी एमजीए स्पोर्टस् कार आहे. तिची किंमत 25 हजार पौंड ठरवण्यात आली आहे. त्याचा एक मित्र हा संग्रह विकण्यासाठीचे काम सांभाळत असून मूळ मालकाची ओळख गुप्‍त ठेवण्यात आली आहे. मात्र, हा एक स्थानिक उद्योजक असल्याचे सांगण्यात आले. लंडनमध्ये इतक्या मोटारी ठेवण्यासाठीची दुसरी ‘इनडोअर’ जागा मिळणे कठीण असल्याने त्याने हे कलेक्शनच विकण्याचे ठरवले.

Back to top button