सातारा : पुढारी वृत्तसेवा : नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ आणि ४ जुलै रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलैरोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर आज संध्याकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांची निवड सोपी मानली जात आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज दाखल केला.
नार्वेकर विजयी झाल्यास सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् जावई विधानसभेचे अध्यक्ष असे चित्र निर्माण होणार आहे. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. महाराष्ट्रात प्रथमच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतीपदी जावई सासरे अशी जोडी असणार आहे. त्यांचे बंधू अॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक होते.
नार्वेकर हे मूळचे शिवसेनेचे. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी होवून ते खासदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने नार्वेकरांना विधान परिषदेत संधी दिली. मात्र २०१९ च्या निवडणुकीआधीच नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत ते भाजपचे आमदार झाले.
हेही वाचलंत का ?