शनिशिंगणापूर : पहिल्याच दिवशी हजार भाविकांचा अभिषेक | पुढारी

शनिशिंगणापूर : पहिल्याच दिवशी हजार भाविकांचा अभिषेक

सोनई : पुढारी वृत्तसेवा:  शनिशिंगणापूर येथे शनी चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले असून, पहिल्याच दिवशी एक हजार भाविकांनी चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक घातला. यातून देवस्थानला पाच लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे.

देशभरात अनेक देवस्थानमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तेथील देवस्थानच्या वतीने दर्शनाकरता पेड पासची व्यवस्था केली. त्याच पद्धतीने श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांची मागणी लक्षात घेऊन शनिवार दि. 18 जूनपासून पाचशे रुपयांची देणगी पावती घेऊन चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करण्याची सोय उपलब्ध करून दिली.

शनिवारपासून चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेकास सुरुवात झाली. सशुल्क चौथर्‍यावर दर्शन घेतलेल्या भाविकांना देवस्थानच्या वतीने श्रीफळ, प्रसाद, उदी व शनीदेवाचा फोटो देऊन सन्मानित करण्यात आले. काल रविवारी सायंकाळपर्यंत 300 भाविकांनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले आहे.

मागीलवेळी दर्शनासाठी आलो असताना गर्दीमुळे ढकलाढकली झाली. त्यामुळे दर्शनाचा आनंद घेता आला नाही. पण, आज पाचशे रुपयांत चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेऊन प्रसन्न वाटले. शनिमूर्तीला स्वतःच्या हाताने तेल अभिषेक घालण्याचे भाग्य लाभले.
-मुकेश वाघेला अहमदाबाद, गुजरात

Back to top button