नगर : पंढरपूर यात्रेसाठी 300 बसची आषाढ वारी | पुढारी

नगर : पंढरपूर यात्रेसाठी 300 बसची आषाढ वारी

नगर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त 10 जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार अहमदनगर विभागाच्या वतीने पंढरपूर वारीसाठी 300 विशेष बस सोडल्या जाणार आहेत. 5 जुलै ते 13 जुलै या कालावधीत 24 तास या विशेष बस धावणार आहेत. या नियोजनासाठी अधिकार्‍यांची लगबग सुरु आहे.

पंढरपूरची यात्रा म्हणजे विठोबाच्या भक्तांची मांदियाळी. आषाढ महिना जवळ आला की, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ भक्तांना लागते.त्यामुळे शेतीची कामे आटोपून वारकरी कोणत्या तरी एका दिंडीत सहभागी होऊन पंढरीच्या वारीत सहभागी होतात. बहुतांश भक्तजन एसटी महामंडळाच्या बसचा आसरा घेत आहेत.

वारकर्‍यांसाठी पुणे शहरात मोफत लसीकरणाची सुविधा

पंढरपूर यात्रेमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधीचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत पंढरपूरची यात्राच झाली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. नगर विभागाला या यात्रेतून जवळपास एक कोटीचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांत नगर विभागाला दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.

कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे यंदा 10 जुलै रोजी पंढरपूर यात्रा होत आहे. सर्वसामान्य जनतेला पांडुरंगाचे दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची सोय केली आहे.

अहमदनगर विभागाने सध्या तरी 300 बसचे नियोजन केले आहे. तयारीसाठी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची लगबग सुरु आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. 5 जुलै ते आषाढी पौर्णिमा (दि.13) पर्यंत वारकर्‍यांना एसटीची विशेष सेवा उपलब्ध असणार आहे. याशिवाय 1 जुलैपासून देखील काही जादा बस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

गावात 44 भाविक असल्यास स्वतंत्र बस

ज्या गावातून 44 जण पंढरपूर यात्रेस जाण्यासाठी इच्छूक असतील, अशा भक्तांना एसटी महामंडळाने स्वतंत्र बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील भक्तांनी महामंडळाच्या आगार प्रमुखांशी संपर्क साधावा. संपर्क साधून बस बूक केल्यास थेट गावातूनच जाण्या- येण्याची व्यवस्था केली जाणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अहमदनगर विभाग नियंत्रक विजय गिते यांनी केले आहे.

Back to top button