

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शालेय शिक्षण विभागासाठी सन 2022-23 या कालावधीसाठी की रिझल्ट एरिया (उद्दिष्टे) अर्थात केआरए निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासह विविध उद्दिष्टे पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. शिक्षण विभागातील अधिकारी, उपसंचालक यांना संबंधित केआरए पूर्ण करायचा असून, त्याचा मासिक अहवाल शिक्षण आयुक्तांना द्यावा लागणार आहे.
राज्याला राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे व दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण खाली आणणे, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, राज्यात सर्वोत्तम खेळाडू तयार करण्यासाठी सुविधा निर्माण करणे इत्यादी प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्याचबरोबर प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत 10 टक्केने वाढ करणे, एमआयएस प्रणालीचे विकसन करणे, शासकीय, अनुदानित व आरटीई अंतर्गत 25 टक्के शुल्क प्रतीपूर्तीचा लाभ घेणार्या खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी पूर्ण करणे, कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करणे, 12 शैक्षणिक उपग्रह सुरू करणे, पहिली ते बारावीचा कंटेट विकसित करणे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे ऑनलाईन पगारासाठी सीएमपी प्रणाली लागू करणे, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे, पीजीआयमध्ये 50 गुणांनी वाढ करणे यासंह अन्य उद्दिष्टांची पूर्तता करावी लागणार आहे.
त्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियोजनबद्ध कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच याबाबतचा मासिक प्रगती अहवाल शिक्षण आयुक्तांना देण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव टि. वा. करपते यांनी दिल्या आहेत.