वाकड येथील ज्ञानेश्वर उद्धव शेडगे व वडगाव धायरी येथील सागर निवृत्ती टिळेकर यांच्या बैलजोडींना यंदा पालखीसाठी मान मिळाला आहे.
वाकड येथील ज्ञानेश्वर उद्धव शेडगे व वडगाव धायरी येथील सागर निवृत्ती टिळेकर यांच्या बैलजोडींना यंदा पालखीसाठी मान मिळाला आहे.

‘हिरा-राजा’, ‘हिरा-मोती’ पेलणार तुकोबांची पालखी

Published on

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

श्री संत तुकाराम महाराज यांच्या 337व्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्यासाठी (सारथ्यासाठी) वाकड येथील ज्ञानेश्वर उद्धव शेडगे यांच्या 'हिरा-राजा' आणि वडगाव धायरी येथील सागर निवृत्ती टिळेकर यांच्या 'हिरा-मोती' या बैलजोडींना मान मिळाला आहे.

नगारखाना चौघडा गाडीसाठी येलवाडी येथील जालिंदर यशवंत बोत्रे यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आल्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख हभप संतोषमहाराज मोरे यांनी केली.
या वेळी संस्थानचे अध्यक्ष हभप नितीनमहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख हभप विशालमहाराज मोरे, हभप माणिकमहाराज मोरे, विश्वस्त हभप संजयमहाराज मोरे, हभप भानुदासमहाराज मोरे, हभप अजितमहाराज मोरे आदी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यातील रथाला ओढण्यास आपल्या बैलजोडीच्या निवडीसाठी 13 तर चौघडा गाडीसाठी 3 बैलजोडी मालकांनी संस्थानकडे अर्ज केले होते. अर्जाची परीक्षण करून त्यातील दोन बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षणामध्ये बैलांचे आरोग्य, वय, शिंगे, रंग, शेपटी, खूर, उंची, शुभ्रता आणि त्यांची काम करण्याची क्षमता आदी निकषांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या रथावरील सारथ्य करणार्‍याला संस्थानकडून ओळखपत्र दिले जाईल. त्यालाच रथात बसण्याची परवानगी असते, असे संस्थानचे अध्यक्ष हभप नितीनमहाराज मोरे यांनी सांगितले.

चौघडा गाडीसाठी दुसर्‍यांदा मान

चौघडा गाडीसाठी निवड करण्यात आलेल्या बोत्रे यांनी गेल्या तीस वर्षांपासून देहू आणि आळंदी पालखीत सेवा करीत असल्याचे सांगितले. या वर्षी चौघडा गाडीसाठी राजा व पैंजण या बैलजोडीची निवड करण्यात आल्याने दुसर्‍यांदा मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पालखी रथाला बैलजोडीचा मान मिळण्यासाठी संस्थानकडे गेल्या सहा वर्षांपासून अर्ज करीत आहे. यंदा प्रथमच सेवा करण्याचा मान मिळाला. बैलांचे वय चार वर्षे असून, हिरा व राजा अशी त्यांची नावे आहेत. त्यांची उंची सहा फूट, तर रंग पांढरा शुभ्र आणि टोकदार शिंगे आहेत.

                                                                              – ज्ञानेश्वर शेडगे

संस्थानकडे गेल्या 4 वर्षांपासून अर्ज करीत आहे. प्रथमच मान मिळाला आहे. हिरा व मोती अशी बैलांची नावे असून, त्यांचे वय 6 वर्षे व उंची 6 फूट आहे.

                                                                            – सागर टिळेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news