जमीन मोजणी आता होणार वेगात; दहा तालुक्यांत ‘ई-मोजणी व्हर्जन 2’ चा प्रयोग | पुढारी

जमीन मोजणी आता होणार वेगात; दहा तालुक्यांत ‘ई-मोजणी व्हर्जन 2’ चा प्रयोग

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गेल्या काही वर्षात जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनींच्या मोजणीसाठी येणार्‍या अर्जांची संख्या वाढली आहे. मोजणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आता ’ई मोजणी र्व्हजन 2’ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर हवेली, बारामतीसह राज्यातील दहा तालुक्यांमध्ये ती राबविण्यात येत आहे. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार जमिनीची मोजणी करावयाची असेल, तर भूमिअभिलेख कार्यालयात जावे लागते. तेथे लेखी अर्ज केल्यानंतर मोजणीचे चलन दिले जाते. ते चलन घेऊन बँकेत भरल्यानंतर त्याची प्रत पुन्हा भूमिअभिलेख कार्यालयात दाखल करावी लागते. त्यानंतर तो अर्ज ऑनलाइन फिड केला जातो.

त्यानंतर मोजणी कोणत्या तारखेला होणार आहे, सर्वेअर कोण असणार आहे याची माहिती मिळते. ही कार्यपद्धती पूर्ण करण्यास नागरिकांचा मोठा वेळ जातो. त्यानुसार मोजणी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातून गैरप्रकार घडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून भूमिअभिलेख विभागाने ’ई मोजणी व्हर्जन 2’ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हवेली, बारामती राज्यातील दहा तालुक्यांमध्ये तो राबविण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेली संगणक प्रणाली एनआयसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी या दहा तालुक्यांत लागू करण्यात आली आहे. लवकरच ती राज्यात लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button