कोल्हापूर : कासारवाडीच्या माळावर गव्यांचा वावर ; नागरिकांच्यात भीतीचे वातावरण | पुढारी

कोल्हापूर : कासारवाडीच्या माळावर गव्यांचा वावर ; नागरिकांच्यात भीतीचे वातावरण

कासारवाडी ; पुढारी वृत्तसेवा : येथील तळीचे माळ येथे शुक्रवारी सकाळी एक पुर्ण वाढ झालेला गवा नागरिकांच्या निदर्शनास आला. दरम्यान दोन गवे सादळे (ता. करवीर) येथील सिद्धेश्वर डोंगरावरही नागरिकांच्या निदर्शनास आले.

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कासारवाडी सादळे घाटात जुने जिनिसीस कॉलेजजवळ दोन गवे निदर्शनास आले. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एक पुर्ण वाढ झालेला गवा गावच्या दक्षिणेकडील शेतीतून वाघजाई मंदिरापासून गावाशेजारीच असलेल्या तळीच्या माळावरील वडाच्या झाडापासून मातोश्री रमाबाई आंबेडकर मिलच्या बाजूस जाताना प्राणीमित्र किरण चौगुले यांच्या निदर्शनास आला. चौगुले यांनी त्याचा पाठलाग केला. गवा पुढे गावच्या तलावातून यादव, लुगडे माळमार्गे अंबपवाडीच्या जंगलात गेला. पाऊस असल्याने माळावरील घरातील नागरिक व जनावरे बाहेर नव्हती.

दरम्यान सादळे(ता. करवीर)येथील सिद्धेश्वर डोंगरावर मंदिराच्या पाठीमागे दोन गवे सकाळी येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. गव्यांनी बडवेमळा शेतातील पिकांचे नुकसान केले.

गवे गावाच्या वस्तीजवळ येऊ लागल्याने नागरिकांच्यात भीती

जानेवारी महिन्यात कासारवाडीच्या डोंगरात दिसणारे गवे हळूहळू शेती परिसरात निदर्शनास येऊ लागले. आता तर गावच्यालगत माळावर येऊ लागले आहेत. या माळावर नागरिकांची वस्ती आहे. यामुळे गव्यांचा वावर आता गावात होतो की काय अशी भिती नागरिकांच्यात आहे.

हेही वाचा

Back to top button