

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरू असून उत्खननात निघालेल्या लाल मातीची अनधिकृत वाहतूक सुरू आहे. लाल माती सातार्यात आणून चढ्या दराने विकली जात असून यामध्ये बराच काळा बाजार सुरू आहे. लाल मातीच्या बेकायदा वाहतूकप्रकरणी महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे. याप्रश्नी कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
सातारा नगरपालिका मालकीच्या असलेल्या कास धरणाची सध्या उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. हे काम नगरपालिकेने सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाला दिले आहे. तीन-चार वर्षांपासून हे काम सुरू आहे. धरणाची उंची वाढवण्यासाठी जुन्या भिंतीपासून काही फूट खाली नवी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामातून हजारो ब्रास लाल माती निघाली आहे. या आयत्या निघालेल्या लाल मातीवर काहीजण दोन-तीन वर्षांपासून डल्ला मारण्याचे काम करत आहेत.
ही लाल माती सातार्यात आणून चढ्या दराने तिची विक्री केली जात आहे. यातून सरकारच्या लाखो रुपयांच्या रॉयल्टीला चुना लावला जात आहे. शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. कास पठार तसेच इतर भागातूनही लाल माती विनापरवाना आणली जात आहे. प्रामुख्याने विटा बनवण्यासाठी तसेच गार्डनसाठीही या मातीचा वापर केला जातो.
कित्येक वर्षांपासून मातीची चोरी
कास धरणाच्या उत्खननातून निघालेली माती सातारा व परिसरात आणून विकली जात असून त्यातून पैसे कमवले जात आहे. कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत तक्रारीही येऊ लागल्या आहेत. मात्र, लक्ष दिले जात नसल्यामुळे लाल माती बेकायदा वाहतूकप्रकरणी कारवाई होणार का? असा सवाल केला जात आहे.
कास धरणातील लाल मातीची बेकायदा वाहतूक करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. याबाबत संबंधित तहसीलदारांना कल्पना देऊन उपाययोजना केल्या जातील. धरण मालकी असलेली सातारा पालिका तसेच काम करत असलेल्या पाटबंधारे विभागालाही याबाबत कळवले जाईल.
– प्रशांत आवटे, महसूल उपजिल्हाधिकारी, सातारा