नितीन राऊत
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीत (ता. पुरंदर) अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांचे सुशोभीकरण झाल्यास येथे पर्यटन क्षेत्र म्हणूनही चालना मिळेल. जेजुरीगडाच्या पश्चिमेला 19 एकरांत असलेला पेशवेकालीन तलाव अद्याप दुर्लक्षित आहे. येथील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण झाल्यास पर्यटनक्षेत्र म्हणूनही जेजुरी शहराचा कायापालट होऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, मल्हार गौतमेश्वर मंदिर, प्राचीन लवथळेश्वर मंदिर, ऐतिहासिक होळकर तलाव, पेशवे तलाव, चिंचेची बाग, मल्हारतीर्थ, लक्ष्मीतीर्थ आदी ऐतिहासिक वास्तू आहेत. येथे वर्षाकाठी पन्नास लाखांहून अधिक भाविक येतात.
जेजुरी हे तीर्थक्षेत्र पुण्यापासून 49 किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या उपरांगेतील जयाद्री डोंगररांगेत हे खंडोबा मंदिर आहे. याच्या पायथ्याशी जेजुरी शहर वसले आहे. येथे पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष होते. भाविकांना पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरी शहराच्या उत्तरेला 16 एकर जागेत आयताकृती दगडी तलाव बांधला होता. तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सूचनेनुसार जेजुरीगडाच्या पूर्वेला 19 एकरांत गोलाकार दगडी बांधकाम असणारा पेशवे तलाव बांधला गेला.
पेशवे तलाव 19 एकरांत असून, दगडी बांधकामामुळे तो आजही भक्कम आहे. याकाठी पूर्व भागात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. त्याची रचना अत्यंत विलोभनीय आहे. तलावातील पाणी बल्लाळेश्वर मंदिरासमोरील कुंडातून शेतीला सायपन पद्धतीने जाण्याची शास्त्रोक्त योजना येथे होती. बल्लाळेश्वर प्रतिष्ठान व श्री मार्तंड देवसंस्थानने मंदिर परिसरात रेलिंग केल्यामुळे हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. रमणा डोंगररांगेतील पाण्याचा एकमेव स्रोत असल्याने हा तलाव पन्नास टक्केच भरत असतो.
पावसाळ्यात नाझरे धरण अथवा मांडकी डोहातून पाणी सोडून हा तलाव भरून घेतला, तर याचा फायदा परिसरातील शेतीला होईल. तसेच तलावाचे सुशोभीकरण केल्यास नौकानयन आणि रंकाळा तलावाप्रमाणे चौपाटी होऊन एक पर्यटनस्थळ म्हणून परिसर विकसित होऊ शकेल.
पेशवे तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या तलावाचे रूपांतर पर्यटनक्षेत्रात झाल्यास जेजुरी शहराचा कायापालट होऊन अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.