नगर : पुढारी वृत्तसेवा
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपायला काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत 4 लाख 25 हजार मेट्रीक टन ऊस अद्यापि शेतात उभा आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या ऊसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान कारखाना व्यवस्थापनापुढे उभे ठाकले आहे. दररोज 40 हजार मेट्रीक टन गाळप सुरु आहे.
त्यामुळे येत्या 15 दिवसांत शिल्लक ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन साखर आयुक्त कार्यालय व कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. मात्र, ऊस गाळप होईल की नाही याची धास्ती ऊस उत्पादक शेतकर्यांना पडली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून एकूण 23 साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरु केले.
आजमितीस 12 कारखाने सुरु असून, 11 कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. गळीत हंगाम शक्यतो एप्रिलअखेरीस संपला जातो. परंतु, यंदा ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गळीत हंगाम लांबला आहे. मे महिना संपत आला आहे. पावसामुळे ऊसतोडणी मजुरांनी पंधरा दिवसांपूर्वीच घरचा रस्ता धरला. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतशिवारात गाळपाअभावी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिला आहे.
गेल्या आठवड्यात सात लाख टन ऊस शिल्लक होता. आजमितीस जिल्ह्यात 4 लाख 25 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाअभावी उभा आहे. येत्या काही दिवसांत पावसाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतातील उभ्या उसाचे गाळप होईल का अशी धास्ती शेतकर्यांना लागली आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शिल्लक उसाचे गाळप करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.
त्यासाठी जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु असणार आहेत. सध्या बारा कारखाने सुरु असून, दररोज 40 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप सुरु आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत सर्व शिल्लक उसाचे गाळप पूर्ण होणार आहे.
अशोक परिसरात 36 मशीनद्वारे ऊसतोडणी
अशोक परिसरात सध्या श्रीरामपूर तालुक्यातील अशोक कारखाना परिसरात अतिरिक्त ऊस शिल्लक आहे. 45 हजार मेट्रीक टन ऊस इतर तीन कारखान्यांना गाळपासाठी वाटप केला आहे. उर्वरित उसाचे गाळप अशोक कारखाना करणार आहे. ऊसतोड मजूर नसल्यामुळे बंद झालेल्या कारखान्यांचे ऊसतोडणीचे मशीन (हार्वेस्टर) मागविण्यात आले आहेत. त्यामुळे अशोक कारखाना परिसरात आजमितीस 36 मशीनद्वारे ऊसतोडणी सुरु आहे.
हे ही वाचा: