सांगली : दुष्काळी जत तालुक्यात पावसाची जोरदार सलामी, बंधार्‍यावर आले पाणी (video) | पुढारी

सांगली : दुष्काळी जत तालुक्यात पावसाची जोरदार सलामी, बंधार्‍यावर आले पाणी (video)

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागत करून शेत शिवार पेरणीसाठी सज्ज केला आहे. पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी या भागातील उशिरा फळधारणा झालेल्या द्राक्षे बागांना फटका बसला आहे. शेकडो टन द्राक्षांची नासाडी होणार आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता.

दुसरीकडे द्राक्ष बागांची खरड छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागायतदारसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरला आहे .या पावसामुळे पोषक वातावरण म्हणून पालवी फुटण्यास मदत होणार आहे . दरम्यान, कृषी विभागाने पेरणी करण्याची घाई करू नये असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसाने जत शहरासह, बिळूर, डफळापूर, संख, तिकोंडी, उमदी, जाडरबोबलाद, माडग्याळ, येळवी, निगडी खुर्द, बनाळी, शेगाव, गुड्डापूर, खोजनवाडी या भागात चांगला पाऊस झाला आहे. गुड्डापूर धानम्मादेवी मंदिर परिसरात पाणी साचले होते. गेल्या आठवडाभरात तापमानाने उच्चांक गाठला होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण व्हायचे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. अखेर गुरुवारी पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. एकंदरीत या मान्सूनपूर्व पावसाने सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. संततधर व दमदार पावसाने द्राक्ष बागेत पाणी साचल्यामुळे दावण्या व करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खोजनवाडी येथील महेश अजुर यांनी व्यक्त आहे.

तालुक्यात अवकाळी पावसाने सुरूवात केली असून, कितीही ओलावा झाला तरी तात्काळ खरीप पेरणीस सुरुवात करू नयेत. नियमित पाऊस जूनपासून सुरुवात होणार आहे. पोषक वातावरण झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
हणमंतराय मेडिदार, तालुका कृषी अधिकारी, जत

Back to top button