भीमाशंकर अभयारण्यात प्राणी गणनेदरम्यान आढळले शेकरू, सांबर आणि भेकर | पुढारी

भीमाशंकर अभयारण्यात प्राणी गणनेदरम्यान आढळले शेकरू, सांबर आणि भेकर

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा
भीमाशंकर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील प्राणी गणनेत शेकरू, वटवाघूळ, सांबर, भेकर, मोर, ससे, वानर, पाननिवळी, सैनिक बुलबुल, रानकोंबडे, उदमांजर, रानडुक्कर आदी प्राणी आढळून आले. प्राणी व पक्षी यांचे आवाज अनुभवता आले.
भीमाशंकर वन्यजीव विभागाने दि. 16 व 17 मे रोजी पाणस्थळांवरील प्राणी पाहणी व निसर्गानुभव कार्यक्रम राबविला. या पाहणीसाठी चौरा क्र. 1, चौरा क्र. 2, तिरतळे, भाकादेवी, वाजेवाडी, घाटघर, उघडी कळमजाई, कारवीचा दरा हे पाणवठे निश्चित केले होते. या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि वन कर्मचारी यांनी मचाणावर बसून प्राण्यांचे निरीक्षण केले.
वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक अमोल थोरात, वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांच्यासह इतर  वन कर्मचार्‍यांनी ही गणना केली. निसर्गानुभव घेत प्राणी गणना करण्यात आली. यात 20 हौशी निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता.
  मोहिमेत सहभागी निसर्गप्रेमींना जंगलात जाण्यापूर्वी पाणस्थळांवर प्राणी पाहणी करताना घ्यावयाची काळजी व दक्षतेचे मार्गदर्शन करण्यात आले होते. मचाणावर बसल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारू नका, मोबाईल वापरू नका, मचाणावरून सारखे खाली-वर करू नका, कपड्यांवर सेंट मारू नका, माहिती व्यवस्थित जमा करा, दुर्बिणीचा वापर करण्यास हरकत नाही, अशा सूचना वसंत चव्हाण यांनी केल्या होत्या.
गणनेत आढळलेले प्राणी बुद्धपौर्णिमेचे औचित्यसाधून भीमाशंकर अभयारण्यात सोमवारी सायंकाळी साडेपाच ते मंगळवारी सकाळी सातपर्यंत आठ पाणवठ्यांवर प्राणी गणना करण्यात आली. यात शेकरु – 4 , भेकर – 8, सांबर – 28, वानर-माकड – 50, ब्युलू मोरमान – 3, सैनिक बुलबुल – 3, पाननिवळी- 2, मोर – 5, वटवाघळु – 2, ससे – 7, रानकोंबडे -4, उदमांजर – 2, रानडुक्कर -13 आढळून आले.
हे ही वाचा :

Back to top button