नीरज चोप्रा : ‘सरपंच’ नावाच्या टोमण्याने आयुष्याला कलाटणी मिळाली! | पुढारी

नीरज चोप्रा : 'सरपंच' नावाच्या टोमण्याने आयुष्याला कलाटणी मिळाली!

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीरज चोप्रा : ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर फेकले, तर चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात फाऊल झाला. सहाव्या प्रयत्नात नीरजने भाला 84.24 मीटर दूर फेकला.

‘सरपंच’ नावाच्या टोमण्याने आयुष्याला कलाटणी मिळाली!

भारतीय लष्करात सुभेदार असलेल्या नीरजच्या यशाने संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. नीरजच्या बालपणीचा एक चांगलाच किस्सा आहे जो बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. नीरज एकदा शाळेत असताना घरी रडत आला होता. एकदा त्याने नवीन कूर्ता आणि पायजमा घालून बालमित्रांना दाखण्यासाठी बाहेर पडला होता.

नवीन कूर्ता घालून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर काही मित्रांनी टोमणे मारले. त्यामुळेच की काय त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि नवीन नाव सुद्धा पडले. बघा सरपंच आला अशी त्याला उपहासात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर नीरज घरी रडत आला. त्यानंतर त्याचे वडिल आणि काका यांनी त्याला जीममध्ये जाण्यास प्रेरणा दिली. त्याने कणखर होण्यासाठी दिलेला हा सल्ला होता.

रडत घरी येण्यापेक्षा आपल्या मुलाने स्वत:ची लढाई स्वत: लढावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर त्याने दंड मजबूत करण्यास सुरुवात केलीच, पण त्याला भालाफेकीचा मार्ग येथूनच मिळाला. नीरज आज भलेही मोठा झाला असला, तरी त्याचे पानिपत नजीक असलेल्या खंदरा गावातील लोक अजूनही सरपंच म्हणून बोलवतात.

नीरज चोप्रा सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर दुसरीकडे झेकचा जेकब वेडलेच 86.67 मीटर थ्रोसह दुसरा आला. त्याचबरोबर झेकच्या विटेस्लाव व्हेसेलीने 85.44 मीटर थ्रोसह कांस्यपदक जिंकले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे.

भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह एकूण 7 पदके जिंकली. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती.

13 वर्षांनंतर भारतासाठी सुवर्ण

ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एका स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. याआधी 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.

भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशाप्रकारे, अभिनव बिंद्रा नंतर भारतासाठी हे फक्त दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

भारताचे सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक

हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत.

नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त, मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य आणि लोव्हलिना बोर्गोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्य जिंकले आहे.

याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आणि कुस्तीमध्ये रवी दहिया याने रौप्य पदक पटकावले. दुसरीकडे, बजरंगने शनिवारी कांस्यपदक पटकावले.

ट्रॅक अँड फिल्डमधील भारताचे पहिले पदक

ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स म्हणजेच अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते.

परंतु नीरजच्या आधी या स्पर्धांमध्ये एकही भारतीय पदक जिंकू शकला नाही.

ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्डने 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो एक इंग्रज होता, भारतीय नव्हता.

Back to top button