उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात हिटलरशाही : नवनीत राणा - पुढारी

उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात हिटलरशाही : नवनीत राणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिल्लीमध्ये आज (दि.११) दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मागितली, पण सत्ता मात्र दुसऱ्यासोबत स्थापन केली. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करण्यात आली आहे, अशी टीकाही रवी राणा यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला संकटापासून वाचविण्यासाठी हनुमान चालिसा म्हणण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु आमच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्यात आली. इंग्रजांच्या कायद्याचा वापर करून राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा कायदा मोडून काढल्याबद्दल आम्ही स्वागत करतो. मुंबईचे पोलीस आयुक्त पांडे यांना आमिष दिल्याने आमच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राणा यांनी यावेळी केला.

एका महिला खासदारावर चुकीचे पद्धतीने कारवाई करण्यात आली. याबाबत आम्ही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली आहे, असे सांगून राणा पुढे म्हणाले की, माझा मुंबईत फक्त एकच फ्लॅट आहे. परंतु परिवहन मंत्री अनिल परब यांचे मुंबईत १५ फ्लॅट आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराची लंका आहे. महापालिकेतील हा भ्रष्टाचार आम्ही संपवणार आहे. त्यासाठी महापालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेविरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाकरे यांनी शिवसेनेला सुलेमानसेना केली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

आम्ही घाबरणारे नाही, तर लढणारे आहोत. उद्धव ठाकरेंची १४ मेरोजी मुंबईत सभा आहे. त्यावेळी आम्ही दिल्लीत हनुमान आरती करणार. मोदींचा फोटो वापरून शिवसेना सत्तेत आली आहे. रूग्णालयातील फोटो संजय राऊतांनी काढल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी यावेळी केला. हा लीलावती रूग्णालयातील डॉक्टरांचा अपमान आहे. लीलावती रूग्णालयाला पाठवलेल्या नोटीशीवर आक्षेप घेत आमचे घर पाडा. पण रूग्णालयावर कारवाई का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मी उपचार घेतले म्हणून रूग्णालयाला नोटीस पाठवली का, असा सवाल करून आतापर्यंत अनेक सेना नेत्यांनी या रूग्णालयात उपचार घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button