नाशिकच्या दिंडोरीत होणार राज्यातील पहिले ट्रायबल इंडस्ट्रीअल क्लस्टर | पुढारी

नाशिकच्या दिंडोरीत होणार राज्यातील पहिले ट्रायबल इंडस्ट्रीअल क्लस्टर

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या तालुक्यातील जांबुटके येथील आदिवासी औद्योगिक क्लस्टरला उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून 31.51 हेक्टर क्षेत्रावर राज्यातील पहिले आदिवासी औद्योगिक क्लस्टर साकारणार आहे. या क्लस्टरमुळे आदिवासी भागातील नव उद्योजक, शेतकरी यांना शेतीपूरक तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे.

भुनिवड समितीच्या अभिप्रायानुसार मौजे जांबुटके, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील ट्रायबल इंडस्ट्रिअल क्लस्टर निर्माण करण्यासाठी मौजे जांबुटके येथील एकुण 31.51 हे. सरकारी क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसुचित करण्याकरिता समितीमार्फत 29 जानेवारी रोजी पाहणी करण्यात आली होती. या क्षेत्रास म.औ.वि. अधिनियम 1961 चे कलम (ग) लागु करण्यासाठी उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार मौजे जांबुटके, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील ट्रायबल इंडस्ट्रिअल क्लस्टर निर्माण करणेकामी मौजे जाबुटके येथील एकुण 31.51 हे. आर सरकारी क्षेत्राची स्थळपाहणी उप अधिकारी (3) यांच्या अध्यक्षतेखालील भूनिवड समितीतर्फे करण्यात आलेली होती.

स्थळपाहणी अहवालानुसार प्रस्तावित क्षेत्रापासून वाघाड धरण अंदाजे 9 कि. मी. अंतरावर आहे. तेथून सदर क्षेत्रास पाणीपुरवठा होऊ शकतो. प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रापासून नाशिकरोड रेल्वे स्टेशन 30 कि. मी. अंतरावर आहे. प्रस्तावित क्षेत्र नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग क्र. 848 लगत असून दिंडोरी गावापासून तसेच अति. दिंडोरी औद्योगिक क्षेत्रापासून अंदाजे 10 किमी अंतरावर आहे. प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र हे आदिवासी बहुल भागात असून समन्यायी औद्योगिक विकासाचे महामंडळाचे धोरण, रोजगार निर्मितीला चालना व मागास घटकांना विकासाची संधी या बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. या क्लस्टरमुळे आदिवासी भागातील उद्योजकांना उद्योग उभारणे सुलभ होणार आहे. या वसाहतीमुळे शेतकऱ्यांना कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button