OBC & BJP : भाजप युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवणार ‘ओबीसी पॅटर्न’ | पुढारी

OBC & BJP : भाजप युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवणार 'ओबीसी पॅटर्न'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने उत्तर प्रदेशामध्ये मोठा विजय मिळविल्यानंतर उत्तर प्रदेशचा ओबीसी पॅटर्न (OBC & BJP) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाची रणनिती आहे की, उत्तर प्रदेशसारखे महाराष्ट्रातही छोट्याछोट्या ओबीसी जातींना जोडले जाऊ शकते, त्यातून सत्ता हाती मिळण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.

आकडेवारीचा विचार केला, महाराष्ट्रात ३२.४ टक्के लोक मराठा समाजाचे आहेत. हा वर्ग कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काॅंग्रेससोबत जोडलेला आहे. तर मागास वर्ग (ओबीसी) वेगवेगळ्या पक्षांकडे वाटला गेला आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये कुंभार, राजभर, नाभिक, निषाद, लोधी, पाल, तेली, अशा मागास जाती आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी समाजात अनेक जाती आहेत. त्यामध्ये नाभिक, कुंभार, परीट, गुरव, सुतार, लोहार, कोळी, महार, मांग आदी जाती आहेत. (OBC & BJP)

योगी सरकारने निवडणुकीपुर्वी ओबीसी जातींची विविध संमेलने आणि विविध जातींना जोडून ठेवणारा बोर्ड स्थापन केला होता. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप नेत्या पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे यांसारखे दिग्गज ओबीसी नेत्यांची मोट बांधून भाजपने ओबीसी जातींना एक संघ बनवून पार्टीशी जोडण्याचे अभियान सुरू केले आहे.

पुढील सहा महिन्यात महाराष्ट्रात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई आणि पुणे महानगर पालिकांसहीत १० महानगरपालिकांबरोबरच २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. यांना मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जात आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. कोरोना महामारीमुळे आणि ओबीसींना राजकीय आरक्षण नाकारल्यामुळे स्थानिका निवडणुका अधांतरी राहिल्या होत्या. ओबीसी जातींना पार्टीसोबत जोडण्याच्या अभियान अंतर्गत भाजपने स्थानिक निवडणुकांत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधी स्पष्ट मत नोंदवलेले आहे.

Back to top button