जोतिबा यात्रेनंतर डोंगर उतरताना पर्यायी मार्ग वापरा | पुढारी

जोतिबा यात्रेनंतर डोंगर उतरताना पर्यायी मार्ग वापरा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जोतिबाची चैत्र यात्रा दोन वर्षांच्या खंडानंतर होत असल्याने यंदा यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. यात्रेनंतर जोतिबा डोंगरावरून उतरणार्‍यांची गर्दी अधिक असल्याने यमाई, गिरोली घाट, दानेवाडी, वाघबीळ फाटा तसेच जुने आंब्याचे झाड, गायमुख, सामाजिक वनीकरण, केर्ली या पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

14 एप्रिलपासूनच भाविक वाडी रत्नागिरी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 16 एप्रिल या यात्रेच्या मुख्य दिवशी पालखी सोहळ्यापूर्वीपर्यंत दुचाकींना डोंगरावर प्रवेश दिला जाईल. यावेळेपर्यंत येणार्‍यांनी त्यांना उपलब्ध होईल त्याठिकाणी दुचाकी पार्क कराव्यात. पालखी सोहळ्यानंतर भाविक एकाचवेळी बाहेर पडतात, त्यामुळे अचानक होणारी गर्दी टाळण्यासाठी वरील पार्किंगची जागा भरल्यानंतर येथील पार्किंग बंद करण्यात येणार आहे.

जोतिबाची चैत्र यात्रा

मोफत दुचाकी दुरुस्ती, पंक्चर काढण्याची सेवा

कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनमार्फत घाटामध्ये दर एक किलोमीटरवर पंक्चर व दुरुस्ती सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी संपर्क क्रमांकांचे बोर्डही लावण्यात आले आहेत. पेट्रोलिंगसाठी फिरते पथक राहणार आहे. जोतिबा डोंगरावर कोठेही वाहन बंद पडल्यास त्याठिकाणी मोफत सेवा दिली जाणार असून, यासाठी 80 ते 100 मेकॅनिकलची टीम कार्यरत असणार आहे. यासाठी नाना गवळी (8623936359), संजय पाटणकर (9421282827), रवी कांडेकरी (9422417626) असे काहींचे क्रमांक देण्यात आले आहेत.

Back to top button