Ukraine Russia War : 25 युक्रेनियन महिलांना बंदी बनवून रोज बलात्कार | पुढारी

Ukraine Russia War : 25 युक्रेनियन महिलांना बंदी बनवून रोज बलात्कार

कीव्ह ; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर (Ukraine Russia War) हल्ला केल्यापासून मोठ्या संख्येने येथील नागरिकांनी देश सोडला आहे. त्यानंतर आता रशियन लष्कराच्या नृशंसपणाचे अनेक पुरावे समोर येत आहेत. बुचा शहरातील नरसंहारानंतर आता तेथील एका गावात तळघरात रशियन सैन्याने 25 महिला आणि मुलींना बंदी बनवून त्यांच्यावर दिवसातून अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचाही समावेश असून, तिच्यासह 9 महिलांवर या अत्याचारातून गर्भारपण लादले गेले आहे.

संबंधित विद्यार्थिनीनेच ब्रिटनच्या ‘डेली मेल’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून हा भयानक प्रकार समोर आला आहे. दाशा असे या शाळकरी मुलीचे नाव असून, तिने दिलेल्या माहितीनुसार, रशियन बंदूकधारी सैनिक तिच्या घरात घुसले. त्यांनी आधी दारू ढोसली आणि बंदुकीतून गोळीबाराची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ती मुलगी जीव वाचविण्यासाठी कुटुंबासोबत एका निवारागृहात राहत होती. रशियन सैनिकांनी एका तळघरात 25 महिलांना ओलीस ठेवले होते. या सर्व मुली-महिला 14 ते 25 वयोगटातील आहेत. रशियन सैनिक त्यांच्यावर दररोज बलात्कार करतात. यातून 9 मुलींना दिवस गेले आहेत. 13 मार्चपासून हा प्रकार सुरू आहे.

दाशा म्हणाली की, क्रास्वानिका या आमच्या गावात 78 वर्षीय बुजुर्ग महिलेवरही बलात्कार केला गेला आहे. आमचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनीही रशियन सैन्याच्या या अत्याचाराबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. एका रशियन सैनिकाला अटकही केली गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत शेकडो महिला रशियन सैनिकांच्या वासनेच्या शिकार ठरल्याचा अंदाज आहे.

बूचा शहरातील एका महिलेने तिच्या मुलीवर तिच्यासमोरच भर रस्त्यात बलात्कार केल्याचे सांगितले. एका 11 वर्षीय मुलाचेही लैंगिक शोषण त्याच्या आईसमोरच केले गेले. 14 वर्षीय मुलीचेही लैंगिक शोषण केले गेले आहे. कीव्हपासून 45 किलोमीटवर असलेल्या ठिकाणी एका महिलेला तिच्या पतीसमोर उचलून जवळच्या घरात नेऊन बलात्कार केला गेला. जेव्हा ती महिला घरी आली तेव्हा घरात तिला पतीचा मृतदेह आढळून आला. या गावातील अनेक महिलांवरही बलात्कार केला गेला आहे.

रशियाची युद्धनौका उद्ध्वस्त (Ukraine Russia War)

युक्रेन-रशिया युद्धाला 50 दिवस पूर्ण झाले असून, युक्रेनने काळ्या समुद्रात (ब्लॅक सी) रशियाची युद्धनौका उद्ध्वस्त केली. काळ्या समुद्राचे संरक्षण करणार्‍या या युद्धनौकेला नेपच्यून क्षेपणास्त्रांमुळे मोठे नुकसान झाले असले, तरी विस्फोटापूर्वी जहाजातील सर्वांना बाहेर काढले गेले होते, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेची युक्रेनला 6,000 कोटींची मदत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला 800 मिलियन डॉलर्स (6,098 कोटी रुपये) ची लष्करी मदत मंजूर केली आहे. या मदतीमध्ये तोफा, चिलखती गाड्या, हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

अमेरिकेच्या 398 खासदारांवर रशियाची बंदी

रशियाने अमेरिकेच्या 398 खासदारांवर बंदी घातली आहे. या खासदारांना रशियाने प्रवासबंदीच्या यादीत टाकले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून रशियाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडाच्या 87 खासदारांवरही रशियाने निर्बंध लादले आहेत.

Back to top button