नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ | पुढारी

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रींग प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आज (सोमवार) वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम ४ एप्रिलपर्यंत वाढला आहे. दरम्यान, न्यायालयाने मलिक यांना कोठडीत बेड आणि खुर्ची देण्यास परवानगीही देण्यात आली आहे.

डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी मलिक यांना २३ फेब्रुवारीरोजी ईडीने आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्‍यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतरही त्‍यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, नवाब मलिक यांची आज न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना आज सत्र न्यायालयात हजर केले असता सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांच्या वकिलांनी काही मागण्यांसाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यात बेड मिळावा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याने कमी मिठाचे जेवण मिळण्यासाठी घरचे जेवण मिळावे, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच मलिक यांनी न्यायालयात काही मेडिकल रिपोर्ट सादर केले आहेत. मलिक यांच्या या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या असून त्यांना बेड, गादी आणि खुर्ची मिळणार आहे. तर मेडिकल रिपोर्ट पाहून नंतर निर्णय देणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, नवाब मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button