हिंगोली : बाळापुरात सराफा दुकानाचे शटर उचकटून २ लाखांचे दागिने लंपास | पुढारी

हिंगोली : बाळापुरात सराफा दुकानाचे शटर उचकटून २ लाखांचे दागिने लंपास

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथील मदिना ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेख इरफान यांचे मदिना ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून शेख इरफान घरी गेले होते. त्यानंतर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शेख यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. यानंतर शेख यांनी लगेच बाळापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्‍यांनी दुकानाकडे धाव घेतली असता, यावेळी दुकानाचे शटर उघडलेले व कुलूप तोडल्‍याचे त्‍यांना दिसून आले.

शेख इरफान हे रात्री बारा वाजेपर्यंत दुकानात काम करत बसले होते. तर पहाटे 4 वाजता ही घटना त्यांच्या लक्षात आली. अवघ्या 4 तासात चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारत 2 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत संशयिताचा शोध सुरू केला आहे.

Back to top button