रत्नागिरी; जाकीर शेकासन : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष, माजी मंत्री भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी आपल्याला 'गुहागर मतदार संघातून आमदार व्हायला आवडेल' असा मानस व्यक्त केल्यामुळे विद्यमान आमदार आगामी निवडणूक कुठल्या मतदार संघातून लढवणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
आमदार भास्कर जाधव चिपळूण-संगमेश्वरमधून विधानसभेची की रायगडमधून लोकसभेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष विक्रांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.
जिल्हा परिषदेची पाच वर्षे मुदत संपल्याने आपली प्रतिक्रिया देताना विक्रांत जाधव यांनी आपल्याला आमदार व्हायला आवडेल आणि तेही गुहागरमधून असे जाहीर केल्याने पुढची राजकीय रणनीती सुरु झाल्याचे संकेत देण्यात आले.
गुहागर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार भास्कर जाधव शिवसेनेकडून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. असे असताना आता त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी आपण गुहागरमधून आमदार होण्याचे जाहीर केल्याने भास्कर जाधव कुठून निवडणूक लढवणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
भास्कर जाधवांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर या मतदारसंघातून चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. संगमेश्वर तालुक्याचे पालकत्व भास्कर जाधव यांनी यापूर्वी केले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना भास्कर जाधव यांनी संगमेश्वर तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत.
तसेच संगमेश्वर तालुक्यात त्यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. याचा फायदा भास्कर जाधवांना नक्की होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण भागात भास्कर जाधव यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे ते चिपळूण-संगमेश्वरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या लोकसभेची निवडणूक अनंत गीते यांनी रायगडमधून लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीतेचा पराभव केला होता. याचबरोबर शिवसेनेचे नेतृत्व माजी खासदार अनंत गीते यांच्यावर नाराज आहे.
यामुळे शिवसेना लोकसभेसाठी रायगडमधून भास्कर जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती आगामी राजकीय समीकरणावर हे सगळे अवलंबून असणार आहे.
हेही वाचा