पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत आयकर विभागाने आज (मंगळवारी) राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर छापेमारी केली. यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही प्रश्न उपस्थित करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे की, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा संबंध असण्याची शक्यता आहे. राहुल कनाल याचा कॅफे बँड्रा नावाचं एक रेस्टॉरंट असून तेथील सर्व स्ट्रक्चर अनियमित आहे. कोरोनाच्या काळात निघालेल्या निविदामध्ये राहुल यांने हस्तक्षेप केल्याचा संशय आहे. मुंबईतील नाइट लाइफ गँगचा राहुल सदस्य आहे. तो कुणाचे निकटवर्तीय आहेत? संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?, असे सवाल करत राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
तसेच राहुल यांची थेट शिर्डीच्या संस्थानावर ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राहुलचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. राहुलकडे इतका पैसा कुठून आला?, असाही प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे.
ऊठसूठ चोऱ्या करायच्या, लोकांची लुटमार करायची, कोविडच्या नावाखाली टेंडरमधून पैसे खायचे, रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही, केंद्रीय यंत्रणा वगैरे… यात भाजपचा काय संबंध?, असा प्रतिसवाल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना करत महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात, असा घणाघात राणे यांनी केला.
दरम्यान, राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावरील छापेमारीवर प्रतिक्रिया देताना हे छापे म्हणजे महाराष्ट्रावर आक्रमणच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर नितेश राणे यांनी त्यांनाच प्रतिसवाल करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ