पुणे : पुढारी वृत्तसेवा
फ्रेंडशिप क्लबच्या नावाने सेक्ससाठी उच्चभ्रु महिलांना पुरविण्याचे प्रलोभन दाखवून सुमारे २५० जणांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार हा एका वृत्तवाहिनीत मालिकाचे लेखन करीत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तो आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा. अनुप सुकलाल मनोरे (वय ३५, रा. मोहम्मदवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने लोकांची फसवणूक करण्याकरीता गणेश शेलार असे बनावट नाव धारण केले होते. गेल्या १० वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो, असे सांगून फसवत असल्याचे उघड झाले आहे. मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब या नावाने तो ही फसवणूक करीत होता.
अनुप मनोरे हा एक लेखक आहे. त्याची मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांबरोबर ओळख होती. त्याने हिंदी रंगभूमीवरील शेक्यपियरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स' या नाटकावर आधारित 'रंग रसिया' या नाटकात काम केले होते. त्याने का अभिनेत्याचे जीवन उपभोगले आहे. याच वेळी त्याची दोन रुपे देखील समोर येत आहेत. एक लेखक आणि दुसरे गुन्हेगार.
सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी यांनी सांगितले की, अनुप मनोरे याला अटक केली त्यावेळी त्याच्याकडे असलेली डायरी जप्त केली आहे. त्यात फसवणूक केलेल्या सुमारे २५० जणांची यादी आहे. त्यात त्याने नावासमोर त्यांच्याकडून किती पैसे घेतले हे लिहून ठेवले आहे. २०१० पासून तो हा प्रकार करत होता. त्यात पुण्यासह राज्यभरातील विविध शहरातील लोकांचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते.
रोड टू हेवन : 'एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा' मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब अशा नावाने तो जाहिरात करीत असे. महिलांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर सीम कार्ड घेत त्यांच्या नावाने बँक खाते उघडण्यास लावत असे. शहरातील एका व्यावसायिकाला क्लब हा श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून, त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ६० लाख २० हजार रुपये उकळले. या गुन्ह्याचा तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे.
अशा प्रकारे महिला पुरविण्याचे आमिष दाखवून अनुप मनोरे यांने अनेकांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
-भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त