सोलापूर : पैशाच्या देवाण-घेवाणीतून तरुणाचा खून, महिलेसह तिच्‍या साथीदाराला अटक | पुढारी

सोलापूर : पैशाच्या देवाण-घेवाणीतून तरुणाचा खून, महिलेसह तिच्‍या साथीदाराला अटक

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :
वडाळा (ता उत्तर सोलापूर ) येथील दीपक उर्फ दादा कोळेकर (वय- ३५ ) याचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मयत दीपक यांचे वडील शिवाजी कोळेकर यांनी उत्तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

याची सविस्तर माहिती अशी की, दिपक कोळेकर यांचे गावातील जयश्री (बाई) भोसले (वय ४५) यांच्याशी गेल्या पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते. दोन अडीच वर्षांपूर्वीपासून जयश्री भोसले दिपकडून पाच लाख रुपयांची मागणी करत होत्या. मागील वर्षी गणेश उत्सवात जयश्री भोसले हिने दिपक यांच्या घरी जाऊन पाच लाख रुपयांसाठी भांडण काढले होते. दिपक यांनी शेतातील जनावरे, ट्रॅक्टर, व बुलेट विकून जयश्री हिला पैसे दिले होते. माझे आणखी काही पैसे आहेत म्हणत जयश्री ही दिपकला सतत त्रास देत हाेती.

मयत दीपक कोळेकर यांचे वडाळा येथील चौकात पान टपरी दुकान आहे. शनिवारी (दि. २३) दुपारी चारच्या सुमारास पान टपरीत बसलेल्या दीपककडे जयश्री भोसले व सोबत अन्य साथीदार मयत दीपक यांना मोटारसायकलवर बसून घेऊन गेले. रात्री साडेआठच्या सुमारास मयत दिपक याच्या भावाने वडील शिवाजी यांना दिपक याचा जयश्री भोसलेने खून केला असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या वडीलांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता संशयित जयश्री हिच्या घरासमोरच्या गटारीमध्ये दीपक जखमी अवस्थेत दिसून आला, तर जयश्री हातात लोखंडी पाईप घेऊन उभी होती. मयत दिपक यास उपचाराकरिता वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले व तेथून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले मात्र डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले.  तपास सोलापूर तालुका सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक  करीत आहेत. जयश्री व अन्य साथीदारांवर भा.दं.विक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button