राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात : गृहमंत्री | पुढारी

राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात : गृहमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रवी राणा व नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करायचे आहे असे सांगितल्यानंतर मुंबईत शिवसैनिक व राणा दाम्पत्यांत वाद झाला. याप्रकरणी राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात ना. वळसे पाटील म्हणाले की, पोलिसांनी त्यांच्याकडील माहितीच्या आधारे कृती केली, त्यात चुकीचं काही नाही. राणा दाम्पत्याच्या कृती मागे नक्कीच कुणाचा तरी हात, त्याशिवाय ते असं धाडस करू शकत नाही.

नाशिक येथे आयोजित दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलिस सक्षमपणे ही परिस्थिती काबूत ठेवतील याचा मला विश्वास आहे. पोलिसांकडून योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जातेय असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री म्हणाले, किरीट सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नव्हती. लोकप्रतिनिधी म्हणून सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार आहे, मात्र कोठडीतील व्यक्तीला भेटायला जायचं काहीच कारण नाही. तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचं काम त्यांनी करायला नको होते. मात्र जे झालं ते योग्य नाही. असे कोणते कारण आहे की संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका आहे, असं काय काम आहे की त्यांना झेड सुरक्षा देण्यात आलीय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही मत ना. वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी ना. वळसे पाटील म्हणाले की, याबाबत पोलिसांकडे आधी माहिती होती. मात्र संवादात गडबड झाली. याबाबत कारवाई केली असून पोलिसांच्या बदल्यादेखील केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button