बोरामणी शिवारातील दरोडा प्रकरणी उस्मानाबादच्या ६ दरोडेखोरांना अटक | पुढारी

बोरामणी शिवारातील दरोडा प्रकरणी उस्मानाबादच्या ६ दरोडेखोरांना अटक

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील बाबुराव हिरजे यांच्या वस्तीवर ९ मार्च रोजी पहाटेच्या दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून ७५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व राेकड लंपास केली हाेती. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत बाबूराव हिरजे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणीतील दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे.

या दरोड्यातील अक्षय काळे (रा. पिंपळगाव ता. जामखेड जि.अहमदनगर), अनूज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत. विकास भोसले हा सूत्रधार असून या गुन्ह्यातीील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.

वैभव उर्फ बोर्ड एकनाथ काळे (रा. फकराबाद जि.अहमदनगर) चालक संतोष झोडगे (रा. डोकेवाडी ता. भूम जि.उस्मानाबाद), अजय देवगन उर्फ सपा शिंदे, सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघे रा. शेळगाव ता. परांडा जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (रा. पांढरेवाडी ता. परांडा, जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी ऊसतोड मजूर आहेत.

याप्रकरणी सुलोचना बाबूराव हिरजे यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. दरोडेखोरांवर गुन्हाही दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. परंतु गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे सुहास जगताप, सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध सुरू केला होता. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनीही घटनास्थळी भेट दिली होती. त्याकरिता ६ तपास पथके तयार करण्यात आली होती.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे, सहाय्यक पोलीस पोलीस धनंजय पोरे, रविंद्र मांजरे, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, अंकुष माने, सत्यजित आवटे, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, शैलेष खेडकर, सुरज निंबाळकर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, हरीदास पांढरे, रवि माने, दया हेंबाडे, अमोल माने, गोसावी, बारगीर, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितिन चव्हाण, पांडूरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेष मोरे, अन्वर अत्तार, रतन जाधव, देवा सोनलकर, समीर शेख यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडीओ :  दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button