नाशिक : महिलांनी केली २ लाखांची गावठी दारु नष्ट ; ९ अड्डे उद्ध्वस्त | पुढारी

नाशिक : महिलांनी केली २ लाखांची गावठी दारु नष्ट ; ९ अड्डे उद्ध्वस्त

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयातील काकशेवड येथील महिलांनी गावठी दारु बनविण्याचे दारुचे ९ अड्डे उद्ध्वस्त करत गावात दारुबंदीसाठी एल्गार पुकारला.  महिलांनी गावठी दारु, रासायनिक पदार्थ व इतर साहित्य असा २ लाखांचा माल नष्ट केला.  या आक्रमक पवित्र्याची चांगलीच चर्चा सुरू झाली असून,  गावठी दारु तयार करणाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.

गाव दारूमुक्त व व्यसनमुक्त करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. पिंपळनेर येथून जवळच असलेल्या काकशेवड ग्रामपंचायतीच्या सरपंच मीराबाई गोरख कुवर, उपसरपंच मीनाबाई चौरे, माजी सरपंच गोरख कुवर, पोलीस पाटील संदीप चौरे, रंजना बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई चौरे, मीराबाई चौरे, शारदाबाई भोये, चित्राबाई चौरे, गिरुबाई साबळे, आक्काबाई चौरे, हिराबाई गवळी, पोपीबाई अहिरे, काळगुबाई चौरे, सखुबाई चौरे, सुनंदाबाई गावित, कमलबाई पवार आदी महिलांनी गावातील दारुबंदी करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

दारुबंदीसाठी वारंवार सांगूनही त्याचा परिणाम न झाल्याने गावातील महिला कंटाळल्या होत्या. व्यसनाधीनतेमुळे उभ्या संसाराचा बट्टयाबोळ होत असल्याने महिलांनीच गावातून दारूबंदी हद्दपार करण्याचा एल्गार पुकारला. सरपंच मीराबाई कुंवर यांनी या महिलांना एकत्र करून या मोहिमेची सुरुवात केली. महिलांनी ९ गावठी दारु अड्डयांवरील दारु, रासायनिक पदार्थ व साहित्य नष्ट केले. महिलांनी रौद्ररूप धारण करीत भर उन्हात दारू अड्डे नष्ट केले याबद्दल महिलांचे कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button