नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या 14 जानेवारी 2022 च्या सभेत सप्तशृंगगडावर खासगी वाहनांमधून येणार्या भाविकांकडून यात्रा करआकारणी करण्याचा कथित ठराव मांडलेला नाही व त्याला मंजुरी देण्यात आली नाही, असे सदस्य महेंद्रकुमार काले यांनी स्पष्ट केल्यानंतर उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनीही असा कोणताही विषय सभेत चर्चेला आला नसल्याचे सांगितले आहे.
यामुळे प्रशासन व अध्यक्षांनी इतिवृत्तामध्ये या विषयाचा समावेश करून स्थायी समितीच्या मूलभूत हक्कांवर अधिक्रमण केले असल्याची भावना सदस्यांमध्ये व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी (दि. 22) सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला खासगी वाहनातून येणार्या यात्रेकरूंकडून प्रत्येक व्यक्ती पाच ते 20 रुपये यात्रा करआकारणी करण्याची परवानगी देणारे आदेश प्रसिद्ध केले. या परवानगी आदेशामध्ये 14 जून 2022 च्या स्थायी समिती सभेतील ठरावानुसार हे आदेश दिल्याचे नमूद केले आहे. मात्र, या सभेवर पाच सदस्यांनी बहिष्कार टाकला होता व केवळ महेंद्रकुमार काले व छाया गोतरणे हे दोन सदस्य उपस्थित होते. या ऑनलाइन सभेत सप्तशृंगगडाशी संबंधित कोणताही विषय पटलावर मांडण्यात आलेला नव्हता, असे महेंद्रकुमार काले यांनी यापूर्वीच स्पष्ट केले असताना आता उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनीही असा कोणताही विषय त्या सभेत मांडला गेला नाही व मंजूर झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे असा ठराव झाल्याच्या कामापुरत्या नकलेवर अध्यक्षांनी सही कशी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.