Lok Sabha Election 2024 | जरांगे-पाटील आज नाशिक दौऱ्यावर; नव्या समीकरणाचे संकेत | पुढारी

Lok Sabha Election 2024 | जरांगे-पाटील आज नाशिक दौऱ्यावर; नव्या समीकरणाचे संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीबरोबर ‘वंचित’चे सूर जुळले नसल्याने, ‘वंचित’ प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रात नव्या समीकरणाचे संकेत दिले होते. तसेच ‘वंचित’कडून दलित आणि मराठा उमेदवारांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ‘वंचित’ने पुणे आणि बीडमध्ये मराठा उमेदवार मैदानात उतरविले असून, नाशिकमध्येही अशा प्रकारचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रयोग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे असले, तरी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच उमेदवारीची माळ मंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडणार असल्याने, शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. शिवसेना शिंदे गटाने मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवल्याने, याठिकाणी उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भुजबळांच्या उमेदवारीवरून मराठा समाज आक्रमक झाला असून, महायुतीने भुजबळांना उमेदवारी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान, यासर्व परिस्थितीवर ‘वंचित’ बहुजन आघाडी लक्ष ठेवून असून, महायुतीने भुजबळांना उमेदवारी दिल्यास पुणे आणि बीडप्रमाणे नाशिकमध्ये मराठा उमेदवार उभा करण्याचा ‘वंचित’चा डाव आहे.

मराठा समाजाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, नाना बच्छाव, डॉ. सचिन देवरे, सुलोचना भोसले, विलास पांगारकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबतचा अहवाल जरांगे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, जरांगे-पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने या इच्छुकांनी आपल्या तलवारी मॅन केल्या आहेत. मात्र, भुजबळ निवडणुकीच्या मैदानात आल्यास यातील बहुतांश जणांनी भुजबळांविरोधात उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्वत: जरांगे-पाटील यांच्याकडूनच इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता असल्याने, मराठा समाजाचा उमेदवार ‘वंचित’च्या तिकिटावर मैदानात उतरविला जाऊ शकतो. ‘वंचित’ सध्या या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असून, महायुतीने उमेदवाराची घोषणा केल्यानंतरच आपला उमेदवार घोषित करण्याची ‘वंचित’ची खेळी आहे.

‘वंचित’समोरचे पर्याय
– छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास, मराठा समाजाकडून करण गायकर यांना मैदानात उतरविण्याच्या तयारीत ‘वंचित’ आहे.
– शिवसेना शिंदे गटाला जागा सोडल्यास ‘वंचित’कडून पवन पवार किंवा अविनाश शिंदे यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
– शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी बंडखोरी केल्यास, मराठा समाजाचा उमेदवार म्हणून ‘वंचित’ त्यांना गळाला लावण्याच्या तयारीत आहे.
– भुजबळांना उमेदवारी दिल्यास मनोज जरांगे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचे सूर जुळण्याची शक्यता आहे. अशात दोघांकडून उमेदवार रिंगणात उतरविला जाण्याची शक्यता आहे.

जरांगे-पाटील आज नाशिक दौऱ्यावर
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, लोकसभा निवडणुकीतच त्यांनी महाराष्ट्रात दौरे करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार जरांगे-पाटील सोमवारी (दि. ८) नाशिक दौऱ्यावर येत असून, ते नांदूरशिंगोटे येथील गोपीनाथ गडाला भेट देणार आहेत. याशिवाय नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास, मराठा समाजाकडून कोणता उमेदवार देता येईल, याची चाचपणीदेखील त्यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button