वाहनांवरील दंड कमी करण्याची संधी; वाहतूक पोलिसांकडून मदत कक्ष | पुढारी

वाहनांवरील दंड कमी करण्याची संधी; वाहतूक पोलिसांकडून मदत कक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. येरवडा येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. वाहनचालकांनी वाहनांवरील थकीत दंड तडजोडीतून कमी करून घ्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 5 मे रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकअदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत कक्ष सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. वाहनचालकांसाठी मदत केंद्र 4 मे पर्यंत (शासकीय सुटी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहनचालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे. मदत केंद्रात न्यायालयातील पॅनल असणार आहे. मदत केंद्रात थकीत दंड कमी करून घेण्यासाठी येणार्‍या वाहनचालकांनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणावी, असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button