Nashik | भुजबळांना उमेदवारी दिल्यास… यांचा थेट इशारा | पुढारी

Nashik | भुजबळांना उमेदवारी दिल्यास... यांचा थेट इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने, मराठा समाज आक्रमक झाला आहे. महायुतीने अन्य कोणताही ओबीसी उमेदवार द्यावा, पण भुजबळांना उमेदवारी देऊ नये. अन्यथा ४८ मतदारसंघांत महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

गायकर म्हणाले की, जेव्हा मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाचा लढा उभा केला, तेव्हा भुजबळांनी जरांगे-पाटील यांच्यावरच केवळ टीकाच केली नाही. तर मराठा समाजाला अन्य जातींसमोर उभे केले. संवैधानिक पदावर असतानादेखील त्यांनी जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. असे असतानादेखील महायुती भुजबळांसमाेर पायघड्या घालताना दिसून येत आहेत. आम्ही पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्या उमेदवारीस विरोध केला नाही. केवळ भुजबळांना विरोध आहे. त्यांच्याविषयी समाजामध्ये प्रचंड रोष असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा भुजबळांना उमेदवारी देण्याचा आग्रह का आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच भुजबळांना उमेदवारी दिल्यास, ४८ लोकसभा मतदारसंघांत याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच भुजबळ स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात. मात्र, त्यांनी पुतण्या, मुलगा, सून यांच्या उमेदवारीसाठीच नेहमी प्रयत्न केले आहेत. जर ओबीसी उमेदवारच हवा असेल तर आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी तसेच शिंदे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटातील ओबीसी चेहऱ्यांना उमेदवारी द्यावी, त्यास आमचा विरोध नसेल, अशी भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली.

जरांगे-पाटील यांना शिष्टमंडळ भेटणार
मंत्री भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यास सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करायला लावणार आहे. भुजबळांविरुद्ध उमेदवार देऊन, संपूर्ण मराठा समाजाची एकजूट दाखवून दिली जाईल. मराठा समाज एकजूट असून, ओबीसीसह इतरही समाज मराठा समाजासोबत आहे. भुजबळ निवडून येतील हा महायुतीला कसा काय साक्षात्कार झाला? असा सवालही गायकर यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा

Back to top button