अजित पवार यांच्या विरोधातील असंतोष दूर करण्यासाठी ‘मोदी विरूद्ध गांधी’ घोषणा

अजित पवार यांच्या विरोधातील असंतोष दूर करण्यासाठी ‘मोदी विरूद्ध गांधी’ घोषणा

बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ही पवार विरुद्ध पवार म्हणजेच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्येच झाली तर यामध्ये काहीतरी धोका होऊ शकतो, हे ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करण्याचा प्रयत्न करून अजित पवार यांच्या विरोधातील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शुक्रवारी इंदापूरमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यामध्ये फडणवीस यांनी जाहीरच करून टाकले, की ही लढत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी नसून, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, हे जाहीर करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली याला निरनिराळी कारणे आहेत.

मुळात या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत झाली, तर शरद पवारांबद्दलची असलेली सुप्त सहानुभूतीची लाट ही अजित पवारांच्या विरोधात जाऊ शकते. या दोघांच्या प्रतिमांची ही लढत असताना शरद पवारांची प्रतिमा कधीही मोठी ठरू शकते, हा एक मोठा धोका यामध्ये आहे, तो देवेंद्र फडणवीस यांनी अचूक ओळखलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही पवार विरुद्ध पवार लढत अजिबात आवडलेली नसल्याचे चित्र मतदारसंघात आहे, त्यामुळे त्यांच्यात फार मोठा असंतोष आहे आणि या असंतोषाला इंदापूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तोंड फोडले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या विरोधातील भूमिका जाहीरपणे सर्वांसमोर मांडलेली आहे. भाजप कार्यकर्त्यांमधील हा असंतोष मिटावा, यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये एक-दोन बैठका घेतल्यानंतरही चित्र बदललेले दिसत नसल्यामुळे शुक्रवारी त्यांनी घाईघाईत इंदापूरचा दौरा ठेवला आणि तेथे त्यांना केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला, यावरूनच अजित पवार यांच्या विरोधातील असंतोषाची कल्पना येऊ शकते. त्या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांमधील असंतोष दूर व्हावा, यासाठी ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा लढतीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये मुळात गेल्या 30-35 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधून अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून आलेले कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आता पुन्हा अजित पवारांनाच बळ द्यायचं आणि नंतर आपण अडचणीत यायचं का, अशी एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. अशा वेळेला आपल्याला आगामी काळात काहीच त्रास होऊ शकणार नाही, अशा सुप्रिया सुळेंकडे या कार्यकर्त्यांचा कल जाऊ शकतो. एक तर हे कार्यकर्ते तटस्थ राहू शकतात किंवा विरोधी कामही स्थानिक पातळीवर करू शकतात, याची चिंता भाजप नेतृत्वाला आहे.

हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे या नेत्यांनी हा सगळा असंतोष पुढे आणलेला आहे. त्यामुळे ही लढत दोन्ही पवारांच्या मध्ये आहे अशी भावना निर्माण होण्यापेक्षा ती मोदी विरुद्ध गांधी अशी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. आगामी काळात भाजपकडून हाच मुद्दा पुढे केला जाईल. आताही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीच्या खासदार असावा, याच धर्तीवर भाजपचा प्रचार सध्या तरी सुरू आहे.

बारामती मतदार संघात पवारविरोधी कार्यकर्ता किंवा पवारविरोधी विचार म्हणजे काय हे पाहिले तर असे दिसते, की अलीकडच्या 25 ते 30 वर्षांत तो सर्व विचार अजित पवारांना विरोध करण्यामध्येच आहे. त्यामुळे पवारविरोधी विचारांचा फटका अजित पवारांना जास्त बसू शकतो. शरद पवारांना त्याची झळ कमी प्रमाणात बसू शकते. कारण गेल्या 25 ते 30 वर्षांत पुणे जिल्ह्याचा विशेषत: बारामती लोकसभा मतदार संघाचा सर्व कारभार हा अजित पवार यांनी एकतर्फी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षातील त्यांचे विरोधक, भाजपमधले विरोधक स्थानिक पातळीवरील नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दुखावले गेलेले आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार अशी लढत झाल्यास भाजपचा पवार विरोधी मतदार हा अजित पवारांना जास्त फटका देण्याची शक्यता दिसते. शरद पवारांच्या विरोधात तो फारसा जात नाही. कारण गेल्या 25 ते 30 वर्षांत शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी स्थानिक पातळीवर फारसे लक्षच दिलेले नाही. त्यामुळे कोणी त्यांच्याकडून दुखावण्याचा फारसा संबंध आलेला नाही. अशा वेळेला ही लढत पवार विरोधात पवार न होता ती मोदी विरुद्ध गांधी व्हावी, असा प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांकडून झालेला आहे.

दोन्ही पवार एकत्र असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी जिंकायचा, या जिद्दीने गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी येथे काम केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या मतदार संघाचे पालकत्व घेत येथे दौरे केलेले होते. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा वारंवार बारामतीला भेट देत होते. बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचे जाळे बुथ प्रमुख या पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाने तयार केलेले होते. अचानक तीन जुलैला अजित पवार हे भाजपसोबत आल्यामुळे या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झालेली आहे, कारण पवार यांच्याविरोधात ही सर्व तयारी करत असताना अजित पवारांवर टीका करतच हे कार्यकर्ते संघटनात्मक बांधणी करत होते. अशा वेळेला आता अचानक अजित पवार यांच्या बाजूने मतदान करा ,हे जनतेला जाऊन सांगण्याचे धाडस या कार्यकर्त्यांमध्ये उरलेले नाही. त्यामुळे एकंदरीतच हा असंतोष असलेल्या कार्यकर्त्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. आपण पवारांसाठी काम करत नसून, मोदींसाठी काम करत आहोत, अशी ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी केलेला आहे, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळेला अजित पवारांच्या पक्षाचे चिन्ह घराघरात पोहोचवून आगामी काळात आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचा का, असा विचारही भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. कारण अजित पवार यांची कार्यशैली पाहता ते कोणतीही निवडणूक सहजपणे घेत नाहीत, अतिशय गांभीर्याने प्रत्येक जागा आपल्याला मिळेल, नगरसेवक आपला असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले बहुमत असेल, या उद्देशानेच अजित पवार काम करतात आणि हे पुणे जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेले आहे. त्यामुळे आता अजित पवारांना बळ द्यायचे का, असा एक विचारप्रवाहही स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये सुरू आहे. हे सर्व ओळखूनच 'गांधी विरुद्ध मोदी' असे या लढतीचे स्वरूप करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दिसतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news