

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा
राज्य सहकारी, जिल्हा बँका व साखर कारखान्यातील बांडगुळांना पोसण्यासाठी या बँकांकडून साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करण्यात येतो. साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून कर्ज पुरवठा केला, तर कारखान्यांना व्याजामध्ये चार ते साडेचार टक्क्यांचा फायदा होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्याला उसाच्या भावामध्ये फायदा होऊ शकतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. २०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र काळे, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमर कदम, युवराज मस्के, पांडुरंग कचरे, सतीश काटे, ॲड. प्रदीप थोरात आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, राज्य सहकारी व जिल्हा बँका नाबार्डकडून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करतात. तोच कर्ज पुरवठा थेट केल्यास साखर कारखान्यांचा फायदा होईल. एकरकमी एफआरपी देणारे साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, तरीही ते कारखाने अडचणीत गेले नाहीत. ते कारखाने अद्यापही शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. एकरकमी एफआरपीमुळे कारखान्यांवर आर्थिक बोजा येतो, त्यामुळे एफआरपीचे तुकडे करायला लागले आहेत. उसाचे पीक हे आळशी माणसाचे पीक नसून उसाच्या पिकामध्ये कमी नफा मिळतो; परंतु पैशाची खात्री असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे स्पष्ट करीत शेट्टी म्हणाले, इतर शेती मालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो व कमी-जास्त दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळेच सर्व शेतीमालाला हमीभाव देणे बंधनकारक केले तर शेतकरी इतर पिकांकडे वळेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखरेवरील कर्जाची चिंता करण्यापेक्षा ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला पीक कर्ज किती काढतो याची चिंता करण्याची गरज आहे. शून्य टक्के व्याजाचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याला कसरत करावी लागते. शेतकऱ्यांनी दिवसा शेतात राबायचं व रात्री पाणी देण्यासाठी जागायचं. रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होतात. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा बळी जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. दि. 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये दिवसा विजेची मागणी करणारा ठराव करण्यात यावा. सरकारने जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये बदल केल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चौपट नव्हे दुप्पट मोबदला मिळणार असल्याचे देखील शेट्टी म्हणाले.
साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, एफआरपीचा साडेआठ टक्क्यांचा बेस सव्वा दहा टक्क्यांवर नेला आहे. त्यामुळे उसाच्या भावात किमान साडे चारशे रुपयांचा फरक पडत आहे. साखर कारखान्याचे खासगी मालक व तज्ज्ञांना चर्चा करण्यासाठी जाहीर आव्हान आहे. गुजरातमधील कारखाने साडेतीन हजार रुपयांच्या पुढे ऊसाला भाव देत आहेत. त्या ठिकाणचे खासदार-आमदार साखर कारखानदारीत हस्तक्षेप करत नाहीत, तसेच संचालक होत नाहीत. सहवीज निर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर घटणार आहे. छत्रपती कारखान्यात बिगर ऊस उत्पादक सभासदांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढली तर संस्था टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करीत आपल्याला जी काही प्रतिष्ठा मिळाली आहे ती छत्रपती कारखान्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्यासाठी ती गेली तरी चालेल. त्यामुळे आपण ठरवले आहे 'आता झुकेगा नाही साला', असे जाचक म्हणाले.
https://youtu.be/wimwsVNgHnY