

महेश जोशी
कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगांवकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांची झालेली बिकट अवस्था पाहून अनेक मदतीचे हात आता पुढे आले आहेत. लावणीसम्राज्ञी शांताबाई अर्जुन लोंढे – कोपरगावकर या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे समजताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे त्यांच्या मदतीला धावून गेल्या. कोल्हे यांनी स्वत: पुढाकार घेत शांताबाई लोंढे यांना साडी-चोळी व आर्थिक स्वरुपात मदत करत शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घडवले. तसेच पुढील आरोग्य उपचार व्यवस्था करून द्वारका माई वृध्दाश्रम येथे शांताबाई यांच्या सध्या राहण्याची व्यवस्था करून त्यांना मायेचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. शांताबाई लोंढे यांना व त्यांच्यासारख्या वयोवृद्ध कलावंतांना सरकारच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, त्यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात मदत केली जाईल असे आश्वासन स्नेहलता कोल्हे यांनी बोलताना दिले. 'मी आज म्हातारी झाले असले तरी, माझी कला म्हातारी झालेली नाही', अशी भावनिक प्रतिक्रिया शांताबाई लोंढे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच कोल्हे यांनी केलेल्या मदतीबद्दल शांताबाईंनी त्यांचे आभार मानले.
तसेच शांताबाई कोपरगावकर यांची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, शांताबाई लोंढे यांना मदत करण्यासाठी संबंधित महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचेही चाकणकर म्हटलं आहे. तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतार वयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. महिला आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.
महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देशही आयोगान दिले आहेत. याससंदर्भात स्वत: चाकणकर यांनी माहिती दिली.
शुक्रवारी राष्ट्रवादी पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन 75 वर्षांच्या शांताबाई लोंढे यांच्या पुढील आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना हा विषय अवगत करून देत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून लोंढे यांना एक लाखाची मदत व त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी विनंती केली. त्यावर पवार यांनी सकारात्मक पावले टाकण्यासाठी आश्वस्त केले.
एकेकाळी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांच्या लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र, खानदेश गाजवला. चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव येथील कर्मचारी अत्तार भाई यांनी 'शांताबाई कोपरगावकर' हा तमाशा काढला. शांताबाई लोंढे मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला, बक्कळ पैसा मिळू लागला. मात्र उतार वयात ना तमाशा राहिला ना पैसा. आता त्या उद्विग्न अवस्थेत शांताबाई भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालं. सध्या शांताबाईचे वय आज 75 वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही 'ओळख जुनी धरून मनी' ही लावणी गात बसलेली असतात.
हेही वाचा: