वॉशिंग्टन ः माणसाला हार्ट अॅटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर कधी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. त्यामुळे अनेक लोकांना अचानक आलेल्या या संकटाने प्राणही गमवावे लागत असतात. अशावेळी वैज्ञानिकांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की, ज्यामुळे वेळीच अशा संकटाचा छडा लावता येऊ शकेल.
संशोधकांनी एक अशी रक्तचाचणी विकसित केली आहे जी हे अनुमान लावू शकेल की, आगामी चार वर्षांच्या काळात एखाद्या व्यक्तीस हार्ट अॅटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर यांपासून मृत्यूचा किती धोका आहे. ही ब्लड टेस्ट रक्तातील प्रोटिनच्या प्रमाणावर आधारित आहे. त्यावरून याबाबतचे अचूक अंदाज बांधता येऊ शकतात.
एखाद्या रुग्णाला सध्याची औषधे पुरेशी आहेत की, त्यांना हा धोका कमी करण्यासाठी अतिरिक्त औषधांची गरज आहे हे डॉक्टरांना ठरवता येऊ शकते. संशोधनामध्ये सहभागी झालेले डॉ. स्टिफन विल्यम्स यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त उपचाराची गरज आहे का, हे सांगण्यासाठी ही चाचणी पुरेशी आहे. या चाचणीचा वापर नवी कार्डियोव्हॅस्क्युलर औषधांच्या विकासात वेग आणण्यासाठीही होऊ शकतो. सध्या या टेस्टचा वापर अमेरिकेत वेगवेगळ्या आरोग्य प्रणालींमध्ये केला जात आहे. लवकरच ब्रिटनमध्येही अशी चाचणी सुरू केली जाणार आहे.
विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांनी 22,849 लोकांच्या रक्तातील प्लाझ्माच्या नमुन्यांमधील 5 हजार प्रोटिन्सचे विश्लेषण करण्यासाठी मशिन लर्निंगचा वापर केला आणि विशिष्ट अशा 27 प्रोटिन्सचा छडा लावला. या प्रोटिन्समुळे हार्ट अॅटॅक, स्ट्रोक, हार्ट फेल्युअर (हृदयक्रिया बंद पडणे) यामुळे होणार्या मृत्यूचा धोका चार वर्षे आधीच लावता येऊ शकतो.
हेही वाचलंत का?