मानवी शरीरात मिळाला नवा अवयव | पुढारी

मानवी शरीरात मिळाला नवा अवयव

न्यूयॉर्क ः मानवी शरीरात एक नवा अवयव मिळाला आहे. अलीकडेच वैज्ञानिकांनी या नव्या अवयवाचा शोध घेतला. त्याचे कार्य श्वसनसंस्थेला मजबूत ठेवणे हे असते. जे लोक श्वसनसंस्थेच्या आजाराने किंवा धूम्रपानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत त्यांच्यावरील उपचारासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

हा नवा अवयव एखाद्या पेशीसारखाच दिसून येतो. फुफ्फुसांमधील अतिशय नाजूक शाखांमध्ये तो आढळतो. या नव्या अवयवाला वैज्ञानिकांनी ‘रेस्पिरेटरी एअरवे सेक्रेटरी’ (आरएएस) असे नाव दिले आहे. या ‘आरएएस’ पेशी शरीरातील स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशींसारख्याच असतात. त्यांना ‘ब्लँक कॅनव्हास’ पेशी असेही म्हटले जाते. याचे कारण त्या शरीरातील कोणत्याही अवयवाची किंवा पेशींची ओळख करतात. ‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आरएएस’ पेशी फुफ्फुसांवर अवलंबून राहतात. त्यांचे संपूर्ण कार्य हे फुफ्फुसांशी संबंधित प्रणालींनीच चालते. वैज्ञानिकांनी एका निरोगी माणसाच्या फुफ्फुसाची ऊती (पेशींचा समूह) घेतली. त्यानंतर त्यामधील प्रत्येक पेशीमधील जनुकांचे विश्लेषण केले. त्यावेळी या ‘आरएएस’ पेशींचा छडा लागला.

पेनिसिल्व्हानिया युनिव्हर्सिटीच्या पॅरेलमॅन स्कूल ऑफ मेडिसीनमधील एडवर्ड मॉरिस यांनी सांगितले की, माणसाशिवाय मुंगसाच्या प्रजातीच्या प्राण्यांच्या फुफ्फुसातही या ‘आरएएस’ पेशी मिळाल्या आहेत. त्या बर्‍याच अंशी मानवी ‘आरएएस’ पेशींसारख्याच आहेत. ‘आरएएस’ पेशी अशा कणांचे उत्सर्जन करतात, जे बॉकीओल्स म्हणजे जे इंद्रिय रक्तात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे आदानप्रदान करते, त्यामधून वाहणार्‍या तरल पदार्थांसाठी स्तर बनविण्याचे काम करतात. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.

हेही वाचलंत का? 

Back to top button