नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील चारोसे शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वनविभागाकडे केल्या होत्या. अखेर दोन तीन दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, चारोसे शिवारातील असलेल्या वायनरीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या लक्षात आले होते. तसेच गत काही दिवसांत या परिसरातील नागरिकांच्या पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच गेल्या वर्षी दुपारी चारच्या दरम्यान शेताला कुंपण करण्यासाठी काटेरी झुडपांच्या फांद्या आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर भरदुपारी या परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांच्यात घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक यांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. दरम्यान गत दोन तीन दिवसापूर्वीच येथे वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे