नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील चिचोंडी खुर्द येथे एकाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार सहन न झाल्याने मुलीने बापाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाला शहर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
चिचोंडी खुर्द येथील चारी क्रमांक ३६ जवळ रहिवासी असलेल्या मजूर बापाने आपल्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. फिर्यादी मुलगी तेरा वर्ष आणि पाच महिन्यांची असून तिचा बाप हा चाळीस वर्षांचा आहे. मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती पाचवीत असल्यापासून ते आताचा गुढीपाडवा सण साजरा झाल्यानंतरच्या सोमवारपर्यंत वेळोवेळी बापाने घरात कुणीही नसतांना एकटी असल्याचा फायदा घेत, जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केला.
मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सांवजी यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सुरज मेढे याप्रकरणी अधिक तपास करत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनीही या प्रकरणी लक्ष घातले असून येथील पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर तक्रार केल्यानंतर शहर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे.