पुढारी ऑनलाईन : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख नेते मनीष सिसोदिया हे तिहार कारागृहात आहेत. परंतु त्यांचे अधिकृत ट्विट हँडलवरून सातत्याने काहीना काही ट्विट केले जात आहे. आता पुन्हा एकदा मनीष सिसोदिया यांच्या ट्विटवरून 'साहेब तुम्ही मला तुरूंगात टाकून त्रास देऊ शकता, पण माझा निर्धार तोडू शकत नाही' असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणेवर हल्लाबोल केला आहे.
सिसोदिया यांच्या ट्विटरवरून पुढे म्हटले आहे की, 'इंग्रजांनी देखील भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना त्रास दिला होता, पण त्यांचा निर्धार तुटला नाही'- मनीष सिसोदिया यांचा तुरुंगातून संदेश असा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु सिसोदिया यांचे ट्विटर अकाऊंट हे त्यांची सोशल मीडिया टीम किंवा त्यांची पत्नी हाताळत असल्याचे म्हटले आहे. पण याबाबत आम आदमी पक्ष किंवा सिसोदियांच्या कुटुंबाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
यापूर्वी मनीष सिसोदियांच्या ट्विटरवरून केलेल्या ट्विटमुळे कारागृहात असताना सिसोदियांकडे मोबाईल फोन कोठून आला? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तिहार कारागृहात असताना मनीष सिसोदिया यांच्या ट्विटरवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'आजपर्यंत ऐकले होते की देशात शाळा उघडतात, तेव्हा तुरुंग बंद होतात; पण आता या लोकांनी देशात शाळा उघडणाऱ्यांनाच तुरुंगात टाकायला सुरुवात केली आहे.' त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती.